Gold Rate Today: ऐन सणाच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; आजचे दर जाणून घ्या

1 ऑक्टोबरपासून भारतातील सराफा बाजारात सोनं-चांदीने पुन्हा एकदा विक्रमी वाढ नोंदवली आहे.
Gold Rate Today: ऐन सणाच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; आजचे दर जाणून घ्या

Gold Rate Today: 1 ऑक्टोबरपासून भारतातील सराफा बाजारात सोनं-चांदीने पुन्हा एकदा विक्रमी वाढ नोंदवली आहे. दसरा आणि नवरात्रोत्सवाच्या अगोदरच सोन्याचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य खरेदीदारांमध्ये चिंता वाढली आहे. सणासुदीच्या काळात परंपरेप्रमाणे सोने-चांदी खरेदी करण्याची प्रथा असली तरी या दरवाढीमुळे अनेक कुटुंबांना बजेटची चिंता सतावते आहे.

सोन्याचे दर गगनाला भिडले

मंगळवारपासून सुरू झालेल्या तेजीला बुधवारी आणखी वेग आला आणि सोन्याने आतापर्यंतचा सर्वाधिक दर गाठला. MCX वर डिसेंबर गोल्ड फ्युचर्सने प्रति 10 ग्रॅम 1,17,800 रुपयांपर्यंत उसळी घेतली. मुंबई बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,17,450 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोने 1,07,660 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले आहे.

चांदीनेही तोडले विक्रम

सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वेगाने वाढ होताना दिसत आहे. MCX वरील डिसेंबर फ्युचर्समध्ये चांदीचा दर 1,44,844 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला. तर मुंबई बाजारात किरकोळ पातळीवर चांदीने थेट 1,51,100 रुपये प्रति किलो चा टप्पा गाठला आहे.

दरवाढीमागचं कारण काय?

विशेषज्ञांच्या मते, अमेरिकेतील आर्थिक अस्थिरता, डॉलर निर्देशांकातील घसरण आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा हे या दरवाढीचे मुख्य घटक आहेत. त्यासोबतच अमेरिकेतील सरकारी शटडाऊनमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोनं-चांदीकडे वळण घेतले. डॉलर कमकुवत झाल्याने परकीय चलनांमध्ये सोनं तुलनेत स्वस्त झालं आणि त्यामुळे मागणीत झपाट्याने वाढ झाली.

एक्सपर्ट काय सांगतात?

गुंतवणूकदारांसाठी सध्याचा काळ सावधगिरीचा आहे. दर इतके उंचावले असल्यामुळे अल्पकालीन खरेदीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष देणं योग्य ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते, आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी हे अजूनही सुरक्षित गुंतवणुकीचे साधन ठरतात. मात्र किरकोळ खरेदीदारांसाठी जीएसटी, मेकिंग चार्जेस आणि टॅक्स यामुळे प्रत्यक्ष खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असते, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

सणासुदीच्या खरेदीवर परिणाम

दसरा आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या आधी दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. पारंपरिकरीत्या सणासुदीला सोने-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं, मात्र वाढलेले दर पाहून ग्राहक सावधगिरी बाळगतील की नाही, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version