ठाण्यात कोरोना आणि ‘एच३एन२’ अशा दोन्ही आजारांची लागण झालेल्या एका ७९ वर्षीय वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला. ‘एच३एन२’चा हा ठाण्यातील पहिला बळी असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ‘एच३एन२’चे रुग्णही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ठाणे शहरात कोरोनापाठोपाठ ‘एच३एन२’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचे आतापर्यंत १९ रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांना ‘एच३एन२’ची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघड झाले आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच निष्काळजीपणेही वागू नये. ताप, सर्दी, खोकला असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी ्जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा असे डॉक्टरांनी म्हटले आहे. ठाणे जिल्ह्यात कमी झालेल्या कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत आहे. तर जिल्ह्यात कोरोना सक्रीय रुग्णसंख्या २८९ इतकी असून त्यापैकी १८७ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत.यातील केवळ ११ रुग्ण रुग्णालयात दाखल असुन उर्वरीत सर्व होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.