लातूर : माजी राज्यसभा सदस्य आणि प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. गोपाळराव पाटील यांचे मंगळवारी, 21 एप्रिल रोजी सकाळी महाराष्ट्रातील लातूर शहरात आजारपणामुळे निधन झाल्याची अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ते 94 वर्षांचे होते. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात सकाळी 7.12 मि. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला, असे सांगण्यात आले. त्यांनी 1994 ते 2000 या काळात भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहिजे. वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या संसदीय समित्यांमध्ये योगदान दिले. डॉ. गोपाळराव पाटील एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना केली, जी लातूरमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय चालवते.
3 ऑक्टोबर 1931 रोजी धाराशिव जिल्ह्यातील कवठा गावात जन्मलेल्या पाटील यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे ते लातूरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ञांपैकी एक बनले. ग्रामीण भागातील त्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेमुळे त्यांना स्थानिकांमध्ये ‘देवमाणूस’ हे प्रेमळ नाव मिळाले होते. त्यांनी हैदराबादमधील कुर्नूल येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याता म्हणून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले होते. नंतर त्यांनी इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनची शाखा स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते तिचे पहिले अध्यक्ष बनले.
लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक, जेष्ठ बालरोगतज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोठे होते. वैद्यकीय सेवांमुळे त्यांना लोक ‘देवमाणूस‘ म्हणायचे. त्यांच्या… pic.twitter.com/j6HvQseweo — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 21, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत डॉ. गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पित केले आहे. तसेच आमदार अमित देशमुख यांनीदेखील पोस्टद्वारे पाटील यांच्या कार्याला वंदन करत आदरांजली वाहिली आहे.
शिक्षणमहर्षी उपाधीसाठी समर्पक ठरावे असे महान कार्य करणारे, शिक्षण क्षेत्रातील थोर मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ, ज्येष्ठ बालरोग तज्ञ, माजी खासदार, लातूर मधील नामवंत शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे, त्यांना… pic.twitter.com/HbKpPUpaeH — Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) April 21, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.