बुलढाणा : आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास जोशपूर्ण आणि संवादात्मक शैलीत जोरदार भाषण करत वातावरण तापवले. विरोधकांवर थेट निशाणा साधत त्यांनी चित्रपटातील संवादांचा आधार घेत केलेल्या टिप्पणींमुळे सभेला रंग चढला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातील सभेत विरोधकांवर जोरदार शब्दबाण सोडले. “एक बार मैने कमिटमेंट करली, तो खुद की भी नही सुनता… शिवसेना को हराना मुश्कीलही नही नामुन्कीन है!” तसेच “मी शोलेतील असरानी नाही… माझ्या पुढे आणि पाठीमागे मोठी ताकद आहे” अशा संवादात्मक शैलीत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. त्यांच्या या टिप्पणींमागे नेमकं लक्ष्य कोण यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सभेत बोलताना शिंदे यांनी लाडकी बहीण योजना अबाधित राहील, याची हमी दिली. ते म्हणाले, “कुणीही मायचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. काही जण अफवा पसरवत आहेत, पण ते दुर्लक्ष करा. आम्हाला वादविवाद करायचा नाही, विकासाच्या दिशेने काम करायचं आहे.” त्यांनी नगरविकास विभागातून बुलढाण्यासाठी आवश्यक निधी देण्याची तयारीही यावेळी जाहीर केली.
मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून बुलढाण्यातील ही त्यांची सहावी भेट असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, जनतेच्या भेटीसाठी ते स्वतः येथे आले आहेत. “विधानसभेत तुम्ही महायुतीला दिलेला दणदणीत विजय नगरपालिकेतही मिळायला हवा. 232 जागा जशा मिळाल्या, तशाच प्रकारे आता शहरात भगवा फडकवायचा आहे,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान केल्यास विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा शिंदे यांनी केला. बुलढाण्यात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आवाहनही केले.
संजय गायकवाडांविषयी विनोदी शैलीत बोलताना शिंदे म्हणाले, “संजय कधी कधी कामाच्या ओघात गडबड करतो, पण त्याची भावना चांगली असते. मी त्याला काही मंत्र दिल्यामुळे तो आता सुधारला आहे. शेवटी तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.” यासोबतच त्यांनी संजय गायकवाडांना दररोज महापुरुषांच्या पुतळ्यासमोर थांबून त्यांच्या इतिहासाचा विचार करण्याचा सल्लादेखील दिला. “असं केलंस तर तुला मागे वळून पाहावं लागणार नाही,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सभेतील शिंदे यांच्या सिनेमॅटिक शैलीतील वक्तव्यांमुळे आणि थेट इशाऱ्यामुळे बुलढाणा राजकारणात तापमान आणखी वाढले आहे.
हेही वाचा: Delhi Pollution Updates: दिल्ली-एनसीआरला दिलासा; GRAP-3 हटवले, आता GRAP-2 लागू
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.