मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने आता उच्चांक गाठला असून, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पार पडलेल्या महायुतीच्या विराट जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर आणि अदानी समूहाला दिलेल्या कथित सवलतींवरून केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिंदेंनी 'डिनर डिप्लोमसी' आणि 'कंटेनर' यांसारखे शब्द वापरून विरोधकांवर थेट निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या भाषणात केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत अदानी समूहाला देशातील महत्त्वाचे उद्योग बहाल केल्याचा गंभीर आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी 10 लाख कोटींचा निधी दिला. पण तुमचा इतका मोठा अहंकार (इगो) होता की तुम्ही कधी राज्यासाठी काही मागायला गेलाच नाही. पंतप्रधान मोदींवर टीका करताना किमान 'जनाची नाही तर मनाची' तरी वाटायला हवी होती."
आपल्या भाषणात आक्रमक पवित्रा घेत शिंदेंनी विरोधकांच्या गुप्त भेटींवरूनही पडदा उठवला. "दीड-दोन वर्षांपूर्वी मोठे उद्योगपती कलानगरला कुणाच्या घरी गेले होते? बंद दाराआड कोणत्या चर्चा झाल्या?" असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच, राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, "जे उद्योगपती शिवाजी पार्कवर जेवायला गेले, ती तुमची कोणती 'डिनर डिप्लोमसी' होती? तुमच्या यार्डात कंटेनर पोहोचले नाहीत का? तुम्ही ज्यांची नावे घेऊन टीका करता, त्यांच्याच मुलांच्या लग्नात तुमची मुले नाचतात. हे दुटप्पी राजकारण जनतेला आता चांगलेच समजले आहे."
राज्यातील गुंतवणुकीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, येत्या काळात दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री स्वतः जाणार असून, त्यातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार आहे. गेल्या 10 वर्षांत अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले असून राज्याचे 'ग्रोथ इंजिन' आता वेगाने धावत आहे. विरोधक केवळ नकाशे पाहून गोंधळले आहेत, मात्र महायुतीचे सरकार मुंबईकरांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
भाषणाच्या शेवटी त्यांनी "जब चाहीए हरी पत्ती, तब याद आती है उद्योगपती" या शब्दांत राज ठाकरेंच्या भूमिकेवर उपरोधिक टीका केली. "आमच्यासाठी 'मुंबईकर फर्स्ट' आणि 'मुंबई फर्स्ट' हेच ध्येय आहे. जुनी परिस्थिती काय होती आणि आता काय बदल झाला आहे, हे मुंबईची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे," असे म्हणत त्यांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. प्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यातील शिंदेंच्या या भाषणाने मुंबईतील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.