धुळे, २१ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी : अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहेत. तसे मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील. मासे खाल्ले की माणूस.. माणूस म्हणजे बाईमाणूस… चिकने दिसायला लागतात, डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार… असे शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले.
विजयकुमार गावित हे नंदुरबारमधील भाजप नेते असून सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री आहेत. धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे १७३५ आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीच्या साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमस्थळी केलेल्या भाषणात डॉ. विजयकुमार गावित यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. गावित बोलत होते त्यावेळी मंचावर त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित उपस्थित होत्या. गावितांच्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
‘ऐश्वर्या राय ही समुद्रकिनारी असलेल्या शहरात राहायची, ती दररोज मासे खायची त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत, तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील, त्वचा सुधारेल’ असे विधान मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. माशाच्या तेलामुळे त्वचा चांगली दिसते, असेही विजयकुमार गावित म्हणाले. गावितांच्या वक्तव्यावर अद्याप राज्य शासनाच्या कोणत्याही मंत्र्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.