वॉशिंग्टन: मध्यपूर्वेतील रणधुमाळीत सध्या बारुदाचा दर्प पसरला असतानाच, जागतिक राजकारणाच्या बुद्धिबळात अमेरिकेने एक अत्यंत आक्रमक खेळी केली आहे. इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण असा वणवा पेटलेला असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक घोषणा करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. "इराणचा अध्याय यशस्वीपणे संपवणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे, मात्र हे काम फत्ते होताच अमेरिकेचा संपूर्ण मोर्चा क्युबाकडे वळेल," असा थेट इशारा देत ट्रम्प यांनी परराष्ट्र धोरणाची आक्रमक दिशा स्पष्ट केली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये 'इंटर मियामी सीएफ' या फुटबॉल क्लबच्या विजयानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी कारवाईचे धक्कादायक आकडेवारीसह वर्णन केले. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिका आणि इस्रायलने पूर्वनियोजित वेळापत्रकापेक्षा कितीतरी अधिक वेगाने इराणची लष्करी ताकद खिळखिळी केली आहे.
गेल्या केवळ 72 तासांत अमेरिकन फौजांनी इराणच्या तब्बल 24 युद्धनौकांना समुद्रात जलसमाधी दिली आहे. या प्रलयंकारी हल्ल्यांमुळे इराणचे नौदल आता पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात गेले असून, त्यांचे हवाई दल अक्षरशः निकामी झाले आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यांनी इराणची हवाई संरक्षण यंत्रणा इतकी भुईसपाट झाली आहे की, अमेरिकन लढाऊ विमाने आता इराणच्या आकाशात कोणत्याही अडथळ्याविना मुक्तपणे घिरट्या घालत आहेत. इराणला आता अमेरिकेच्या अफाट सामर्थ्याची प्रचिती आली आहे. युद्धभूमीवरील या एकतर्फी वर्चस्वामुळे इराणने गुडघे टेकले असून, युद्ध थांबवण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने वाटाघाटींचे प्रस्ताव येत असल्याचे ट्रम्प यांनी उघड केले. मात्र, जोपर्यंत इराण अमेरिकेच्या सर्व अटी पूर्ण करत नाही आणि त्यावर ठोस निर्णय होत नाही, तोवर ही विध्वंसक मोहीम थांबणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.
इराणच्या मुसक्या आवळल्यानंतर ट्रम्प प्रशासनाची नजर आता लॅटिन अमेरिकेकडे, विशेषतः क्युबावर खिळली आहे. मियामीमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या क्युबन-अमेरिकन समुदायासमोर बोलताना ट्रम्प यांचे हे विधान अत्यंत सूचक मानले जात आहे. ट्रम्प यांच्या मते, क्युबा सध्या अमेरिकेशी तडजोड करण्यास अत्यंत उत्सुक आहे. त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यास आता फार वेळ लागणार नाही. या नव्या धोरणामुळे, सध्या अमेरिकेत निर्वासित म्हणून जीवन जगणाऱ्या हजारो क्युबन नागरिकांना लवकरच सन्मानाने मायदेशी परतता येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
एकाच वेळी मध्यपूर्व आणि लॅटिन अमेरिकेत लक्षवेधी उलथापालथ घडवून आणण्याचे ट्रम्प यांचे हे मनसुबे जागतिक राजकारणाला नवी कलाटणी देणारे आहेत. ट्रम्प यांच्या 'मिशन वर्ल्ड पीस' अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. इराणच्या युद्धानंतर क्युबामध्ये कोणती राजकीय उलथापालथ होणार आणि ट्रम्प यांचे हे आक्रमक पाऊल नव्या जागतिक समीकरणांना कसा जन्म देणार, याकडे आता संपूर्ण जगाचे डोळे लागून राहिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.