बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवलं गेलं. विरोधकांनी देशमुख हत्येतील आरोपींनी अटक करण्यासाठी राज्यभर आक्रोश मोर्चे काढण्यात आले. हत्या प्रकरण आणि दोन कोटींचे खंडणी प्रकरण यातील मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे असल्याचे आरोपही स्वतः सुरेश धस यांनी केला होता. याप्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केल्यावर त्याचा 'आका' सुटता कामा नये असं सांगत धसांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याने त्याला नवं राजकीय वळण लागलं आहे. मुंडेविरुद्ध रान पेटवणाऱ्या धसांनी अचानक भेट घेतल्याने सर्व काही मॅनेज झालं का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात रंगू लागला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधलाय.
सुरेश धस यांनी हे कृत्य केले असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सुरेश धस ही सर्व मंडळी एकच असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. सुरेश धस हे कधीही विश्वासास पात्र नव्हते असा आरोपही राऊतांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी याप्रकरणी सत्तेतील अनेक नेते यात सहभागी असून ते दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असा खळबळजनक आरोप करत त्यांनी फडणवीस, बावनकुळे यांच्या अनेकांचा यात सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा : न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जीएम हितेश मेहताला अटक
राशपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धस – मुंडे भेटीबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललंय? असा प्रश्न उपस्थित करत सुरेश धसांनी याप्रकरणी मोठा आवाज उठवला आहे. ते कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत आणि त्यांनी करूही नयेत. कारण देशमुख कुटुंबियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत अशी प्रतिक्रया दिली आहे. धस आणि मुंडे यांची भेट चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणल्याचे सांगितले जातंय. याबाबत बावनकुळे यांना विचारले असता, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची दोघांचीही मागणी देशमुख हत्येतील आरोपांनी कटोर शिक्षा झाली पाहिजे अशी एकच असल्याने दोघांनी एकत्र येणं आवश्यक होतं. धस यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. भाजपा त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा बावनकुळे यांनी केलाय.
महायुतीतील नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी धस आणि मुंडे यांच्या भेटीवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते माणुसकीच्या दृष्टीने ऑपरेशननंतर मुंडेंना भेटायला गेले असावेत असं शिरसाट यांनी सांगितलंय.धस यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचेच मुख्य आरोपींना अभय होतं, याप्रकरणी मुख्य आकाला अटक करा असं सांगत त्यांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेत जवळपास चार तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीमागे दडलंय काय? या प्रश्नाचं सविस्तर उत्तर स्वतः सुरेश धस यांनाच द्यावं लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.