मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींमुळे वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. एका सभेत बोलताना मुंडे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंडे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये ते म्हणताना दिसतात की, “महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांचे वातावरण होते, पण त्या काळात मी वेगळ्याच वातावरणात होतो. एकट्या धनंजय मुंडेला जितके काही बदनाम करता येईल तितके बदनाम करण्यासाठी महाराष्ट्रातील मोठमोठे नेते प्रयत्न करत होते.”
या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळाला. पुढे बोलताना मुंडे म्हणाले, “शेवटी मला वाटलं की माझ्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असणार. नाहीतर इतके लोक आपल्याला संपवण्याचा प्रयत्न का करतील?”
“त्यांना असं वाटत असेल की बाबा आपल्याला पुरून उरेल,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभेत उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
दरम्यान, मुंडे यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी उल्लेख केलेले ‘मोठे नेते’ नेमके कोण? आणि हा आरोप कोणावर आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
आगामी काळात धनंजय मुंडे या वक्तव्याबाबत अधिक खुलासा करतात का, तसेच इतर राजकीय नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.