Devendra Fadnavis : नेपाळसारखं मॉडेल भारतात शक्य नाही, Gen-Z च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या Gen-Z संबंधित वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis : नेपाळसारखं मॉडेल भारतात शक्य नाही, Gen-Z च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या Gen-Z संबंधित वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले की, “भारत आणि नेपाळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ज्यांना नेपाळच्या मॉडेलवर भरपूर प्रेम आहे, त्यांनी तिथे जाऊन राहावं.”

फडणवीस म्हणाले की, भारतातील युवक आज स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आणि आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. “भारतीय युवकांना विरोधासाठी रस्त्यावर उतरण्याची मोकळीक नाही कारण ते भविष्य घडवण्यात व्यस्त आहेत. जगभरात भारतीय अभियंत्यांनी आपली छाप सोडली आहे. सिलिकॉन व्हॅलीसारख्या ठिकाणी भारतातील Gen-Z ने आपली ताकद दाखवली आहे,” असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी नुकतेच देशातील 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या Gen-Z पिढीला लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. नेपाळमधील आंदोलनाचा दाखला देत त्यांनी युवकांना एकत्र येण्याची हाक दिली होती. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटलं की, “ते आता हताश झाले आहेत. Gen-Z ला अपील करून काही साध्य होणार नाही.”

दरम्यान, फडणवीस सध्या राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये झालेल्या भीषण पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पिकांसोबत मातीही वाहून गेली असून शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. यावेळी फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि त्यांना धीर दिला.

मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी तातडीच्या मदत उपाययोजना जाहीर केल्या. “शेतकऱ्यांच्या संकटाची जाणीव आम्हाला आहे. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील,” असे त्यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version