Red Fort blast: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सायंकाळी झालेल्या भयंकर स्फोटाने राजधानी हादरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या वाहनांना आग लागली, काही इमारतींच्या खिडक्यांचे तुकडे फुटले आणि परिसर काळवंडला.
प्राथमिक तपासानुसार, स्फोटासाठी ‘इको व्हॅन’चा वापर झाला होता. या व्हॅनमध्ये तीन प्रवासी होते, आणि स्फोटामुळे जवळच असलेल्या तीन ते चार वाहनांना आग लागली. परिसरात स्फोटाचा प्रचंड आवाज ऐकून नागरिकांनी घाबरून पळ काढला. स्फोट इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या घरांमध्ये दार खिडक्या लहरीतून उघडल्या.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की “खूर्चीत बसलेलो असताना अचानक एवढा मोठा धमाका झाला की मी खाली पडलो. काचांचे तुकडे आणि रक्ताचे सडे रस्त्यावर विखुरलेले होते. लोक ओरडत आणि पळत सुरक्षित ठिकाणी गेले.” राजधर पांडे असे म्हणाले, “आगीचे लोळ आकाशात झेपावले, धूर इतका दाट होता की रस्ते काही क्षण दिसेनासे झाले. असं वाटलं की आपण सगळेजण मरणार आहोत.”
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सात फायर टेंडर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाठवण्यात आले. एलएनजेपी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु असून, अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जाहीर केला गेला आहे. लाल किल्ला परिसर सील करण्यात आला असून संशयितांच्या शोधासाठी पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा झाडाझडती करत आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल असून, जळालेल्या वाहनांचे अवशेष गोळा करून तपास सुरु आहे.
स्फोटानंतर नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, इको व्हॅन कोणाच्या ताब्यात होती आणि त्यामागील हेतू काय, हे तपासले जात आहे. घटनास्थळी रक्ताचे सडे, काचांचे तुकडे आणि आगीचे लोळ पाहून लोकांचा धक्काच वाढला.
दिल्लीमध्ये झालेल्या या भीषण स्फोटाने राजधानीत भीती आणि गोंधळ निर्माण केला आहे. तज्ज्ञ आणि सुरक्षा यंत्रणा स्फोटाच्या कारणांचा तपास करत आहेत, तर नागरिकांसाठी सुरक्षितता आणि जागरूक राहणे अत्यंत गरजेचे ठरले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.