सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना आमदार दीपक केसरकर यांनी या महामार्गाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, सगळा सिंधुदुर्गचा विकास थांबवून ठेवा, दुसरं काही करू नका हीच विरोधकांची भूमिका दिसून येते. त्यामुळेच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
केसरकर म्हणाले की, रस्ता गेल्यामुळे समृद्धी येणार आहे. इथे विकास, उद्योगधंदे येण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग गरजेचा आहे. जे आज या महामार्गाच्या विरोधात आहेत, त्यांनी आजपर्यंत सिंधुदुर्गसाठी काय केलं? त्यांनी विरोधकांवर हेही आरोप केले की, 60 टक्क्यांपेक्षा जास्त जंगल आम्ही राखलं आहे. आमचा विकास थांबवणारे तुम्ही कोण?
हेही वाचा:पत्नीनेच रचला नवऱ्याला लुटण्याचा कट; पतीवर हल्ला करून 95 हजारांची लूट
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निसर्ग, पर्यटनक्षेत्र आणि कृषी माल यांच्या वाढीसाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार असल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या टायगरनंतर सिंधुदुर्गातील ब्लॅक पँथर पाहण्यासाठी पर्यटकांनी यायला नको का? सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासाठी यायला नको का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शक्तीपीठ महामार्ग हा केसरकर यांच्या मतदारसंघातून जात असल्यामुळे त्यांनी त्याला आपला ठाम पाठिंबा जाहीर केला. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे एक विशेष मागणीही केली की, जसा समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्यात आला, तसाच शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा. त्यामुळे रेडी बंदरातून वाहतूक सुरू होईल आणि नागपूरची संत्री समुद्र मार्गे परदेशात पोहोचू शकतील.
आमचा हापूस आंबा नागपूर व दिल्लीला पोहोचेल आणि नागपूरची संत्री आमच्याकडे येतील, अशी स्वप्नमय योजना त्यांनी मांडली. चंद्रपूरनंतर केवळ सिंधुदुर्गात ग्रीन कव्हर उरले असल्याने, विकासाच्या जोडीला पर्यावरणाचे जतन करणं हे आमचं कर्तव्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शेवटी, या विषयावर सर्वांनी एकत्र बसून चर्चेस बसायला हवे, असं आवाहन करत केसरकर यांनी विरोधकांना संदेश दिला की, विकास थांबवणं हे जिल्ह्याच्या हिताचं नाही. सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्याकरिता शक्तीपीठ महामार्ग आवश्यक आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.