Mahendra Thorave On Viral Video : ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरून राजकारण तापलं; ‘हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न’, महेंद्र थोरवे यांचा दानवे-तटकरेंवर गंभीर आरोप

दळवी यांच्या व्हिडिओ संदर्भातील वाद वाढल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
Mahendra Thorave On Viral Video : ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरून राजकारण तापलं; ‘हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न’, महेंद्र थोरवे यांचा दानवे-तटकरेंवर गंभीर आरोप

नागपूर: शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पैशांच्या नोटांसोबतच्या व्हिडिओवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा कथित व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केल्यानंतर या घटनेला मोठा ट्विस्ट मिळाला आणि चर्चांना उधाण आले.

या प्रकरणावर आमदार महेंद्र दळवी यांनी ‘खरं ते समोर आणू’ अशी भूमिका घेतली असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार प्रतिक्रिया देत विरोधकांवर थेट निशाणा साधला. थोरवे म्हणाले, “अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या हातात हा व्हिडिओ आला कुठून? हा व्हिडिओ खोटा आहे. चुकीचा, भ्रामक व्हिडिओ वापरून आमच्या आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

हेही वाचा: Bharat Gogawale : शिवसेनेच्याच आमदार, मंत्र्यांचे व्हिडीओ का बाहेर येतायत? भरत गोगावले थेट म्हणाले..

थोरवे यांनी पुढे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे यांच्यावरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “सुनील तटकरे आणि अंबादास दानवे अगोदरपासूनच सातत्याने आमच्या आमदारांवर बदनाम करण्याचे राजकारण करत आहेत. शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे जुने साठे-लोटे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.”

यासोबतच त्यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा मुद्दाही उपस्थित केला. “भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावे, अशी आमची सातत्याने मागणी आहे. सुनिल तटकरे करत असलेल्या चुकांबद्दल आम्ही वेळोवेळी बोललो आहोत. त्यामुळेच आमदार महेंद्र दळवी यांना आणि आमच्या इतर आमदारांना बदनाम करण्याचा राजकीय प्रयत्न विरोधक करत आहेत,” असे थोरवे म्हणाले.

शेवटी थोरवे यांनी स्पष्ट शब्दांत दावा केला की, “महेंद्र दळवी यांचा जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे तो खोटा आहे आणि दिशाभूल करणारा आहे.” या संपूर्ण प्रकरणामुळे महाविकास आघाडी आणि शिंदे गट यांच्यातील तणाव आणखी तीव्र झाला असून, आगामी दिवसांत या वादाचे पडसाद अजून उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Indigo Flight Cuts: इंडिगोवर DGCAची मोठी कारवाई; दैनंदिन उड्डाणांमध्ये 115 फ्लाइट्सची कपात, 2 दिवसांत नवे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version