Cooper Hospital Mumbai: कूपर रुग्णालयात व्यवस्थेचा बळी! उपचार मिळायला उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू

डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे प्रकृती बिघडत गेली आणि सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Cooper Hospital Mumbai: कूपर रुग्णालयात व्यवस्थेचा बळी! उपचार मिळायला उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू

मुंबई: कूपर रुग्णालयातील अव्यवस्था आणि व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्या आहेत. काही दिवसांपासून रुग्णालयाच्या अंतर्गत व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना समोर येत असतानाच, त्याहून गंभीर प्रकार सोमवारी पहाटे घडला. शौचालयात घसरून गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाला तब्बल दोन तास कोणताही वैद्यकीय उपचार मिळाला नाही. या दुर्लक्षामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

यकृताच्या आजारावर उपचारासाठी दाखल असलेले प्रकाश परब (52) हे गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते. प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने दोन दिवसांत डिस्चार्ज देण्याची तयारी होती. मात्र सोमवारी पहाटे चारच्या सुमारास शौचालयातून परतताना त्यांचा तोल गेला आणि ते जोरात पडले. पडताना डोक्याला तीव्र मार लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. पुरुष रुग्णकक्षातील परिचारिकांनी ही गंभीर माहिती तातडीने ड्युटीवरील तिन्ही डॉक्टरांना दिली. अनेक वेळा कॉल करूनही दोन तासांपर्यंत कोणताही डॉक्टर घटनास्थळी पोहोचला नाही. शेवटी उपचार सुरू करण्यात आले, तेव्हा परब यांची प्रकृती अत्यंत गंभीर स्थितीत पोहोचली होती. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Viral Story: असं काय झालं की अवघ्या काही तासांतच तरुणाने नोकरी सोडली? म्हणाला, ‘पहिल्या तीन तासांत…

रुग्णालय प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून “मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित नाही” असे सांगितले आहे. कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी सांगितले की, परब यांना पूर्वी एनआयसीयूमध्ये उपचार सुरू होते आणि प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना सामान्य कक्षात हलवण्यात आले होते. अपघातानंतर न्यूरोसर्जन आणि निवासी डॉक्टरांनी टाके दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले. तथापि, प्राथमिक उपचारात झालेला विलंब हा रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची भावना कुटुंबीय आणि इतर रुग्णांमध्ये तीव्र आहे.

कूपर रुग्णालयातील व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

कूपर रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिष्ठाता नसल्याने प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे अलीकडील घटनांवरून स्पष्ट दिसते. रुग्णालयाचा ताबा आणि कारभार एका अधिकृत, जबाबदार अधिकाऱ्याकडे देणे अत्यावश्यक असल्याची मागणी सातत्याने होत आहे. पालिकेकडून पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकारामुळे कूपर रुग्णालयातील व्यवस्थापनावरील प्रश्न आणखी गंभीर झाले आहेत. रुग्णांच्या सुरक्षेसाठी आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी पालिका प्रशासन नेमकी पावले कधी उचलणार, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने पुढे येत आहे. 

हेही वाचा: 

Ramesh Pardeshi Join BJP : मनसेला धक्क्यांवर धक्के! पुण्यात ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने कमळ हाती घेतले

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version