बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यासाठी उपमुख्यंत्री आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महायुतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र काँग्रेसचे आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून ही लढत कठिण केली होती. पंरतू आज, गुरूवारी आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला असल्याचे समजले जात आहे. मात्र यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रयत्नांना श्रेय दिले जात आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सकपाळ यांना तर शरद पवारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून बारामती निवडणुकीत काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केल्याचे समजते. परिणामी, अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीच्या वेगाने घडामोडी घडल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर, काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. तर बारामती पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनी कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली होती. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.