मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशातच आता समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार पश्चिम महाराष्ट्रातील भरलेल्या धरणातून जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही, तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होणार याची जाणीव असल्याने मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनीही चिंतेत आहेत. अशातच घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी या संदर्भात नुकतीच बैठक घेत मतदारसंघातील शेतपिके आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण पाऊस-पाणी नसल्याने पिके जळून जात आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणातून पिकांसाठी पाणी सोडावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी नुकतीच जायकवाडी कालवा समितीचे सदस्य आणि याभागातील लोकप्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. जायकवाडी धरणात सध्या ३३ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून ७२८ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध आहे. यातून खरीप पिकाला पाणी देण्यासाठी २०२ एम.एम.क्यू.पाणी उपलब्ध आहे. यामधून ताबडतोब एक रोटेशन लगेच दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी या बैठकीत टोपेंसह सर्वानीच केली.
१ सप्टेंबर रोजी पाणी रोटेशन सोडण्यात येणार आहे. हे रोटेशन २५ दिवस चालणार असून १८० एम.एम.क्यू पाण्याचा वापर यातून होणार आहे. एमडब्लूआरआरए २००५ च्या कायद्यानुसार ११ अन्वये सी प्रमाणे १५ ऑक्टोबरमध्ये जी जायकवाडी धरणाची स्थिती असते. त्या स्थितीनुसार वरच्या धरणातून पाणी सोडण्याची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. जायकवाडीसह त्यावरील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.