दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वराची महाशिवरात्री यात्रेची तिसऱ्या दिवशी सांगता झाली. कोरोना नंतर प्रथमच खुल्या स्वरूपात ही यात्रा झाली. ह्या वर्षी १० लाख भाविकांनी हजेरी लावली कुणकेश्वर मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. आज सोमवती अमावस्या असल्याने समुद्र स्नानही भाविकांनी केले. तासनतास रांगेत उभे राहून भाविकांनी श्री कुणकेश्वराचे दर्शन घेतले.
आबालवृद्धांनी देवस्वाऱ्यांसोबत पवित्र स्रानाचा योग साधला. अपेक्षेप्रमाणे गर्दीचा उच्चांक झाल्याने व्यापारी वर्गातूनही समाधान व्यक्त केले जात होते.एसटी बसेसपेक्षा खासगी वाहनांची रस्त्यावर वर्दळ वाढली होती. वाढत्या गर्दीमुळे काही वेळा श्रींच्या मुखदर्शनाचा निर्णय देवस्थान समितीला घ्यावा लागला. प्रशासनाच्या सर्व विभागांमार्फत योग्य ती सेवा पुरविली जात होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. विद्युत व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये योग्यप्रकारे बजावली. समुद्रकिनारी भाविकांच्या पवित्र स्रानावेळी कोणतीही वाईट घटना घडू नये म्हणून प्रशासन, तटरक्षक दल व देवस्थान कमिटीमार्फत खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात येत होते. समुद्रकिनाऱ्यावरील खाद्यपदार्थांच्या व्यावसायिकांची मोठी उलाढाल झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.