जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर महायुतीचा ‘सस्पेन्स’ संपला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेत जागावाटपाचा आकडा जाहीर केला. मात्र, हा आकडा जाहीर होताच जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला असून, भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले आहे. “युती तोडा, भाजप वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर दुसरीकडे अब्दुल सत्तारांनी भाजपने ‘मैत्री’ बाजूला सारून थेट ‘शड्डू’ ठोकला आहे.
असा आहे 27-25 चा ‘महाविजयाचा’ दावा
पालकमंत्री संजय शिरसाट आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संयुक्तपणे युतीची अधिकृत घोषणा केली. छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील एकूण जागांपैकी भाजप 27 तर शिवसेना 25 जागांवर नशीब आजमावणार आहे. “जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल,” असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला असला तरी, कार्यकर्त्यांमधील धुसफूस महायुतीसाठी ‘धोक्याची घंटा’ मानली जात आहे. विशेषतः वैजापूर तालुक्यात कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या गाड्यांचा ताफा अडवून आपला रोष व्यक्त केला. वैजापूरमधील आठ पैकी फक्त तीन जागा भाजपला मिळाल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि तिथे मोठा गोंधळ उडाला.
सिल्लोड-सोयगावात ‘दोस्तीत कुस्ती’!
या युतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सिल्लोड आणि सोयगाव हे दोन तालुके. येथे महायुतीचा ‘फेविकॉल’चा जोड चक्क तुटला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. या 11 जागांवर कोणतीही ‘मैत्रीपूर्ण लढत’ नसून, आम्ही एकमेकांविरोधात पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असे अतुल सावे यांनी ठणकावून सांगितले. सत्तार बैठकीला येत नाहीत आणि पालकमंत्र्यांचे फोनही घेत नाहीत, असा गंभीर आरोप करत भाजपने आता सत्तारांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना ‘चेकमेट’ देण्याची तयारी केली आहे.
कार्यकर्त्यांचा उठाव: “निष्ठावंतांवर अन्याय नको”
नेत्यांनी जरी हातमिळवणी केली असली, तरी ग्राऊंड लेव्हलवर मात्र चित्र वेगळे आहे. वैजापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी नेत्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. “ज्यांनी आजवर भाजपवर टीका केली, त्यांच्यासाठी आम्ही काम का करायचे?” असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिका निवडणुकीत जो राडा झाला होता, त्याचीच पुनरावृत्ती आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
आता लक्ष ‘एबी’ फॉर्मकडे!
सिल्लोडमध्ये भाजप आता आपले 11 उमेदवार उभे करणार असून, सत्तारांच्या प्रत्येक चालीला उत्तर देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. “सिल्लोडमध्ये शंभर टक्के युती नाही,” हे सावे यांच्या विधानाने स्पष्ट झाले आहे. आता शिवसेना सत्तारांवर काय कारवाई करते किंवा सत्तार स्वतःची वेगळी चूल मांडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात ही ‘बंडाची लाट’ कशी शांत होते, यावरच जिल्हा परिषदेचे भवितव्य अवलंबून आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.