मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यात वादंग पेटले आहे. शनिवारी 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी महाराज, सुरेश धस, बजरंग सोनावणे, मनोज जरांगे पाटील उपस्थित होते.
पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशमुख हत्या प्रकरणी काढलेल्या मोर्चात भाषण केले. या भाषणानंतर आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
नेमकं चॅटमध्ये काय आहे?
उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज… मी पहिली तुझी भेट घेईल नंतर मोर्चाकडे… मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळपासून प्रयत्न करतोय.. असा मेसेज आहे. तसेच मोर्चात मुस्लिम आणि दलितांना ही गोळा करता आलं तर करा. पैश्यांची काळजी करू नको. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे. त्याला ही संधी द्यावी मी सांगितलं आहे. कसं काय कुणावर बोलायचं ते.. उद्या मुंडेला घोडे लावू.. कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कस ठेवतो ते बघू आता…
या व्हायरल चॅटनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ही चॅट खोटी असल्याचा दावा केला आहे. ही चॅट खोटी असल्याचा पुरावा त्यांनी एक्स या सोशल मीडियावर दिला आहे.
हेही वाचा : सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप खोटे ?
आव्हाड यांनी केलेली पोस्ट
माझा खोटा वाॅटसॲप चॅट वायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा…
१) माझ्या वाॅटसॲप डीपीवर माझा फोटो नसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ,"आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे", असे अनुद्गार काढले. तेव्हापासून आंबेडकर ही फॅशन नाही तर "पॅशन" असे म्हणत हा डीपी मी ठेवलेला आहे.
२) मी कितीही रागात असलो, संतापलेलो असलो तरी 'अजित' असे कधीच म्हणत नाही. मी अजित पवार असाच उल्लेख करतो आणि शांत असलो तर 'अजितदादा' असे म्हणतो. हे आता मखलाशी, मस्का पाॅलिसीसाठी लिहीत नाही. मी जे बोलतो ते स्पष्टच बोलतो.
३) हे खोटं चॅट वायरल करताना, 'दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलव,' असे वाक्य माझ्या तोंडून निघाले आहे, असे दाखवितानाही हे चॅट करणाऱ्यांची धर्मद्वेषी, जातीद्वेषी मानसिकताच उघडकीस आली आहे. हे खोटं चॅट लिहितानाही या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या मनातील दलित आणि मुस्लिमांबद्दलचा द्वेषच उघडा पडला आहे.
४) दीपक केदार याची आणि माझी कुठेतरी एकदाच भेट झाली असून फक्त दोन ते तीन वेळा त्याच्याशी बोलणे झाले आहे. दीपक केदारचा उल्लेख करून आंबेडकरी नेता असा उल्लेख करत मनातला दलीत वेष उघड केला
५) #सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या ज्या नंबरचा वापर माॅर्फ चॅटिंगसाठी करण्यात आला. तो नंबर म्हणजे 9930000001 हा साधा वाॅटसॲप आहे. मात्र, ज्यांनी खोटी चॅट तयार केली. त्यांनी या नंबरवरील वाॅटसॲप #बिझनेस असल्याचे दाखविले. म्हणजेच, केवळ कुणाला तरी खुष करण्याच्या नादात स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली आणि उघडे पडले.
६) मी apple phn वापरतो आणि ह्यां लोकांनी माझा chat android फोन मधुन् स्क्रीन शॉट वायरल केला आहे
मला लक्ष्य करण्यासाठी खोटं लिहीले आणि एक्स्पोज झाले. या खोट्या चॅटसाठी कामाला लागलेली टीम अजितदादा यांना माहितही नसेल. पण, असे काही तरी उद्योग करून अजितदादांकडून स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठीच हा बालहट्ट केला अन् स्वतःच्याच पायात पाय अडकून उताणे पडले. खोटे करायलाही डोके लागते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.