चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनेता निवड आणि सत्तास्थापनेवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाला आता तीव्र वळण मिळाले आहे. काँग्रेस विधीमंडळाचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांना जबरदस्तीने उचलून नेल्याचा गंभीर आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. मात्र, या आरोपांना वडेट्टीवार यांनी ठाम शब्दांत प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 30 नगरसेवक निवडून आले असून हा निकाल कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळालेला आहे. “महानगरपालिका निवडणुकीसाठी मी स्वतः 20 सभा घेतल्या, प्रत्येक वॉर्डात जाऊन प्रचार केला. हा कोणाच्या गटबाजीचा नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. कोणताही पक्ष जिवंत ठेवायचा असेल, तर त्या पक्षातील कार्यकर्ता जिवंत आणि सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
जातीय राजकारणाच्या आरोपांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “कुणबी समाजाच्या नावावर चर्चा झाली, सभा आणि मेळावे झाले; पण जनता हुशार आहे. जनतेने अशा फालतू चर्चांवर विश्वास ठेवला नाही. मला सर्व समाजातील लोकांनी मतदान केले असून, त्यात कुणबी समाजाचा वाटा नक्कीच उल्लेखनीय आहे.” एका खासदाराने आमदाराच्या मतदारसंघात जाऊन जातीय विष पेरणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीका केली.
पक्षांतराच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “राजकीय परिस्थिती पाहता कोण कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही, पण माझी भूमिका कायम कार्यकर्त्यांच्या बाजूने राहिली आहे. गेले 20 ते 25 वर्षे मी काँग्रेससाठी लढतो आहे. मला अनेक प्रलोभने, आश्वासने मिळाली; पण मी काँग्रेस सोडली नाही. मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण भाजपमध्ये जाणार नाही. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.”
दरम्यान, प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाने मागणी मान्य केली नाही, तर राजीनाम्याचा इशारा दिला असला, तरी वडेट्टीवार यांनी सामंजस्याचा सूर लावत “झाले गेले गंगेला सोडून आता आपल्याला पुढचा महापौर निवडायचा आहे. आपापसातील गैरसमज दूर करून पक्षासाठी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे आवाहन केले.
विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली की, आज काँग्रेसची महत्त्वाची पक्षांतर्गत बैठक होणार असून, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष स्वतः उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाची निवड, गटनेता निवड आणि पुढील रणनीतीवर निर्णय घेतले जाणार आहेत. सध्या सुरू असलेला अंतर्गत वाद मिटवून काँग्रेस सत्तास्थापनेसाठी एकजुटीने पुढे जाते का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.