Central Railway : मोठी कारवाई! मध्य रेल्वे ॲक्शन मोडमध्ये, फुकट्यांकडून कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी मोहिमेमुळे अनधिकृत प्रवासावर मोठा आळा बसला आहे. एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान 27.51 लाख प्रकरणे उघडकीस आली असून, आतापर्यंत 164.91 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Central Railway : मोठी कारवाई!  मध्य रेल्वे ॲक्शन मोडमध्ये, फुकट्यांकडून कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल

नागपूर: अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने राबवलेल्या व्यापक तपासणी मोहिमेचे ठोस परिणाम समोर आले आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यांच्या कालावधीत तिकीटविना किंवा अपूर्ण तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, यामधून लाखो प्रकरणे उघडकीस आली आहेत.
 
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संपूर्ण मध्य रेल्वे क्षेत्रात 27.51 लाख प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील आर्थिक वर्षात ही संख्या 25.08 लाख इतकी होती. यावरून यंदा तपासणी अधिक कडक करण्यात आल्याचे स्पष्ट होते. प्रवाशांमध्ये शिस्त निर्माण करणे आणि नियमभंग रोखणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
 
या कारवाईचा आर्थिक परिणामही मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 164.91 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षी ही वसुली 138.44 कोटी रुपये इतकी होती. त्यामुळे दंडवसुलीत सुमारे 19 टक्के वाढ झाल्याचे आकडे सांगतात.

हेही वाचा: Maharashtra Police Bharti : महापालिका निवडणुकीचं सावट पोलीस भरती मैदानी चाचणीवर, नवीन तारखा लवकरच होणार जाहीर

 
विशेष म्हणजे, नोव्हेंबर 2025 या एका महिन्यातच 3.74 लाख प्रवासी तिकीटविना प्रवास करताना आढळून आले. नोव्हेंबर 2024 मध्ये ही संख्या 2.98 लाख होती. याच महिन्यात 23.63 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 68 टक्के इतकी आहे.
 
या संपूर्ण कारवाईत नागपूर विभागाचा सहभाग लक्षणीय राहिला आहे. या विभागात 2.92 लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 18.13 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागपूर विभागात तपासणी मोहिमा अधिक तीव्र केल्यामुळे हा आकडा समोर आल्याचे सांगण्यात येते.
 
अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी मध्य रेल्वेने स्टेशन तपासणी, ambush check, fortress check तसेच mega ticket checking अशा विविध पद्धती अवलंबल्या आहेत. मेल-एक्स्प्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये या मोहिमा सातत्याने सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पुन्हा एकदा स्पष्ट आवाहन केले आहे की, रेल्वेने प्रवास करताना वैध तिकीट घेणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई अटळ असून, येत्या काळातही तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्रपणे राबवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी सहकार्य केल्यास अनधिकृत प्रवासावर नियंत्रण मिळेल आणि सर्वांसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध व सुकर रेल्वे सेवा सुनिश्चित करता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा: BJP Maharashtra : महापालिका निवडणुकीत भाजपची मोठी रणनीती, 20 ते 25 टक्के नगरसेवकांचा पत्ता कट?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version