नाशिक: राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा आरोप असलेल्या खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून पोलिसांना सुमारे 58 अश्लील आणि अघोरी कृत्यांचे व्हिडिओ मिळाल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. खरातचा जवळचा मानला जाणारा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यामुळेच खरातचे कारनामे उघडकीस आल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाले प्रकार
माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये नीरज जाधवने खरातच्या नकळत त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये एका फिर्यादी महिलेसोबत घडलेली घटना असल्याचे सांगितले जात आहे.
खरात समाजात ‘साधू’ म्हणून वावरत असताना प्रत्यक्षात तो महिलांशी गैरप्रकार करत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाल्याची माहिती आहे. त्यानंतर नीरजने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीरज जाधव आणि त्याच्या काही साथीदारांनी या वादग्रस्त व्हिडिओंच्या बदल्यात खरातकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र खरातने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
यानंतर नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते. त्याने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहित महिलेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तिलाच व्हॉट्सॲपवर पाठवून धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती संबंधित महिलेने खरातला दिली होती. मात्र स्वतःवर संशय येऊ नये म्हणून खरातने तिला पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
दुसऱ्या महिलेचा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवला
खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता कमी झाल्यानंतर नीरजने सिडको परिसरातील 28 वर्षीय विवाहित महिलेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला, असेही समोर आले आहे. त्यानंतर त्या महिलेच्या मेहुण्याने तिला धीर देत पोलिसांत तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले. यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
नीरज जाधव फरार; पोलिसांवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असलेला नीरज जाधव अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे शिर्डी पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
फेब्रुवारी 2026 मध्ये एका महिलेच्या तक्रारीनुसार नीरज जाधवविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी नीरजने पीडित महिलेला कॅप्टन खरातच्या कार्यालयातील आक्षेपार्ह व्हिडिओंचे स्क्रीनशॉट पाठवत धमकावल्याचा आरोप होता. मात्र तक्रार दाखल होऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही नीरज जाधवचा शोध लागलेला नाही, त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, कॅप्टन खरात प्रकरणातील तपास पुढे जात असताना या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.