मुंबई : महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठतकीत १९ निर्णय झाले. महायुती सरकारने मुंबईतून येणाऱ्या – जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी दिली आहे. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केली. सर्व टोलनाक्यांवर नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपाच्या किरीट सोमैया यांनी टोलमाफीचे स्वागत करताना शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया दिली.
मुंबईमधील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर, मुलुंड – एलबीएस, आनंदनगर, ऐरोली आणि वाशी या टोलनाक्यांवर आता हलक्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. हलक्या वाहनांना चाळीस रुपये टोल द्यावा लागत होता. हा निर्णय रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार आहे. यामुळे मंगळवारपासून निर्णयाचा लाभ नागरिकांना घेता येईल.
महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. याआधी राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर झालेला टोलमाफीचा निर्णय राज्यावरील आर्थिक ताण वाढवेल असा आरोप करत मविआच्या नेत्यांनी राज्य शासनाच्या निर्णयावर टीका केली. नेते टीका करत असताना शिउबाठाच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाचे स्वागत केले. अनेक वर्षांपासून करत असलेल्या आंदोलनाला यश मिळाले, अशी प्रतिक्रिया शिउबाठाच्या कार्यकर्त्यांनी दिली. तर राज ठाकरेंच्या नेतृत्वात पाठपुरावा केला म्हणून टोलमाफी झाली, अशी प्रतिक्रिया मनसेच्या गजानन काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.