मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात सध्या सत्तेच्या बुद्धिबळाचा एक रंजक डाव रंगल्याचे चित्र आहे. राज्याचे प्रशासन ज्यांच्या इशाऱ्यावर चालते ते राज्याचे प्रमुख 'थांबा' असा आदेश देतात, तर शहराच्या प्रथम नागरिक मात्र त्याच विषयावर 'पुढे चला' असा अप्रत्यक्ष संदेश देतात, तेव्हा प्रशासनाची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर' अशीच होते. मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांचा हा वरकरणी प्रशासकीय वाटणारा विषय आता थेट सत्ताधारी पक्षातील अंतर्गत वर्चस्ववादाचा आणि 'इगो'चा कळीचा मुद्दा बनला असून, यातून राजकीय कलहाची नवी ठिणगी उडाली आहे.
मुळात या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी प्रशासक राजवटीत झालेल्या पालिका अभियंत्यांच्या घाऊक बदल्यांशी जोडलेली आहे. पालिकेतील सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा ठपका ठेवत, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली. साटम यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण बदल्यांच्या प्रक्रियेला 'रेड सिग्नल' दाखवत तात्पुरती स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांचा हा स्थगिती आदेश आजही पालिकेच्या दप्तरी कायम आहे.
कथेतील खरा 'ट्विस्ट' इथूनच सुरू होतो. मुख्यमंत्र्यांचा आदेश अस्तित्वात असतानाच, आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणात थेट उडी घेतली आहे. महापौरांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना एक पत्र धाडले असून, त्यात 'म्युनिसिपल इंजिनिअर युनियन'कडून आलेल्या निवेदनाचा संदर्भ देण्यात आला आहे.
या निवेदनाची दखल घेत बदल्यांच्या आदेशांची अंमलबजावणी नियमांनुसार करण्याच्या सूचना महापौरांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. राज्याच्या सर्वोच्च नेत्याचा आदेश एका अर्थाने झुगारून महापौरांनी थेट प्रशासनाला दिलेल्या या 'लेटरबॉम्ब'मुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रशासकीय पेचाला आता अतिशय गडद अशी राजकीय किनार लाभली आहे. ज्या बदल्यांना भाजपच्याच मुंबई अध्यक्षांनी विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळवली, त्याच बदल्या मार्गी लावण्यासाठी भाजपच्याच महापौरांनी प्रशासनाला साकडे घातले आहे. त्यामुळे मुंबई भाजपमध्ये एकाच म्यानात दोन तलवारी खणखणू लागल्या आहेत का? आणि पक्षातच दोन गट पडले आहेत का? अशी दबक्या आवाजातील चर्चा आता राजकीय वर्तुळात उघडपणे होऊ लागली आहे. एकाच पक्षातील दोन प्रमुख नेत्यांच्या या परस्परविरोधी भूमिकेमुळे प्रशासकीय प्रक्रियेचे मात्र धिंडवडे निघत आहेत.
या दोन राजकीय दिग्गजांच्या परस्परविरोधी आदेशांमध्ये महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी मात्र पुरते भरडले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश मानायचा की महापौरांच्या पत्रावर कार्यवाही करायची, या द्विधा मनःस्थितीत अतिरिक्त आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभाग अडकला आहे. आता या बदल्यांच्या 'राजकीय ट्रॅफिक जॅम'मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा मार्ग काढतात आणि पक्षांतर्गत वाढलेल्या या कुरबुरींवर काय तोडगा काढला जातो, याकडे संपूर्ण महापालिका वर्तुळाचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.