मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका समजल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या रणसंग्रामात ‘ठाकरे बंधू’ एकत्र येऊनही चमत्कार करू शकले नाहीत. रक्ताच्या नात्याची ही राजकीय गाठ उद्धव ठाकरे यांना सत्तेच्या शिखराऐवजी सत्तेबाहेर घेऊन गेली आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) गटाला 67, तर राज ठाकरे यांच्या मनसेला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.
मुंबई हे केवळ मराठी माणसांचे शहर नसून ते एक जागतिक स्तरावरील विविधरंगी महानगर आहे. येथे मराठी मतदार सुमारे 35 टक्के असून ते निर्णायक असले, तरी केवळ त्यांच्या जोरावर बहुमताचा 114 चा आकडा गाठणे अशक्य होते. उर्वरित 65 टक्के बिगर मराठी मतदारांनी ठाकरे बंधूंच्या या कट्टर मराठी धोरणाकडे पाठ फिरवली. विशेषतः राज ठाकरे यांची ‘परप्रांतीय’ विरोधी भूमिका आणि ‘लाऊडस्पीकर’ आंदोलनामुळे नाराज झालेला 22 टक्के उत्तर भारतीय, 20 टक्के मुस्लीम आणि 18 टक्के गुजराती – मारवाडी समाज या युतीपासून दुरावला. ‘मराठी अस्मिता’ आणि ‘विकासाचा मुद्दा’ या संघर्षात मुंबईकरांनी प्रगत मेट्रो-3 आणि आधुनिक पायाभूत सुविधांना पसंती देत महायुतीच्या पदरात विजयाचे दान टाकले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देणारा मुस्लीम मतदार राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या आणि लाऊडस्पीकरच्या आक्रमक भूमिकेमुळे पूर्णपणे दुखावला गेला. परिणामी, अल्पसंख्याक बहुल भागांत ही मते उद्धव यांच्यापासून लांब गेली आणि पर्यायाने त्याचा फायदा महायुतीला झाला.
ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली. परप्रांतीय मते गमावण्याच्या भीतीपोटी काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या युतीसोबत जाण्याऐवजी स्वबळावर किंवा ‘वंचित’ सारख्या पर्यायांचा विचार केला. यामुळे उपनगरांमध्ये तिरंगी आणि चौरंगी लढती झाल्या. या ‘वोट स्प्लिट’चा सर्वाधिक लाभ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपला झाला. भाजप विरोधी मतांचे विभाजन झाल्याने अनेक प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार अत्यल्प मतांच्या फरकाने विजयी झाले.
महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहून एक ‘उदारमतवादी’ आणि ‘सर्वसमावेशक’ प्रतिमा तयार केली होती. मात्र, राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांच्या या धर्मनिरपेक्ष कवचाला मोठा तडा गेला.
मुंबईच्या या राजकीय वातावरणात ‘मतांची बेरीज’ करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी रक्ताच्या नात्याला आणि कौटुंबिक वाद मिटवण्याला प्राधान्य दिले. मात्र, राजकारणाच्या पटलावर हा निर्णय ‘सेल्फ गोल’ ठरला आहे. दक्षिणेकडील के. अण्णामलाई यांच्याशी घेतलेला पंगा आणि उत्तर भारतीयांवरील जुन्या टीकांमुळे या समुदायांनी ठाकरेंपासून सुरक्षित अंतर राखले. अखेर, विकासाच्या मुद्द्यावर स्वार झालेली महायुती मुंबईवर ताबा मिळवण्यात यशस्वी ठरली असून, ठाकरेंचा ‘मराठी बाणा’ या वेळी आकड्यांच्या खेळात तोकडा पडला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.