मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे काऊंटडाउन सुरू झाले असून, आखाड्यात उतरलेल्या 1700 हून अधिक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच मुंबईत एका वेगळ्याच प्रयोगाची चर्चा रंगली आहे. हा प्रयोग म्हणजे 'डमी मतदान'. आपल्या प्रभागातील मतदारांचा कल नेमका कोणाकडे आहे, हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी आता हायटेक तंत्रज्ञानाचा आधार घेतला असून, व्हॉटसॲप आणि सोशल मीडियावर 'ऑनलाइन ईव्हीएम'च्या लिंक फिरू लागल्या आहेत.
सध्या मुंबईतील मतदारांना त्यांच्या व्हॉटसॲप, ई-मेल आणि एसएमएसवर एक विशेष लिंक पाठवली जात आहे. या लिंकवर क्लिक करताच मोबाईलच्या स्क्रीनवर थेट निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशिनची डिजिटल प्रतिकृती (Replica) साकारते. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने संबंधित उमेदवाराला दिलेला अधिकृत क्रमांक आणि चिन्ह या मशिनवर हुबेहूब पाहायला मिळते. मतदाराने आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावापुढील बटण दाबले की, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येतो तसा 'बीप' आवाज येतो आणि स्क्रीनवर व्हीव्हीपॅटची पावतीही दिसते.
उमेदवारांच्या काळजाचा ठोका चुकला!
हा डमी मतदानाचा फंडा उमेदवारांसाठी 'लिटमस टेस्ट' ठरत आहे. या प्रक्रियेत मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याचा डेटा थेट उमेदवाराच्या बॅकएंड टीमकडे पोहोचतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डमी मतदानातील आकडेवारी पाहून अनेक दिग्गज उमेदवारांची झोप उडाली आहे. ज्या भागात स्वतःचे प्राबल्य वाटत होते, तिथेच मतदारांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचे पाहून उमेदवारांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
प्रचाराची रणनीती बदलली
या डिजिटल कौलाचा वापर आता प्रचाराची रणनीती बदलण्यासाठी केला जात आहे. ज्या वॉर्डांमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये डमी मतदानाचा टक्का घसरला आहे, तिथे उमेदवारांनी आपला जोर वाढवला आहे. मतदारांच्या नाराजीचे कारण शोधणे आणि ती दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना आखणे यासाठी या डेटाचा उपयोग केला जात आहे. निवडणुकीच्या मुख्य रिंगणात निभाव लागणार की नाही, याचे उत्तर शोधण्यासाठी हा 'डिजिटल मार्ग' सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबईच्या 227 वॉर्डांमधील सुमारे एक कोटींहून अधिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेला हा 'डमी' खेळ प्रत्यक्ष निकालात किती प्रभावी ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, या प्रयोगामुळे मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण होत असली, तरी राजकीय गोटात मात्र यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.