मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे (BMC Election 2026) बिगुल वाजले असून, आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर आता 'महायुती'मधील भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपाचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, एकूण 227 जागांपैकी तब्बल 210 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र, उर्वरित 17 जागांवर अजूनही 'पेच' कायम असून, हा तिढा सोडवण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत खलबतं सुरू आहेत.
युतीमधील हा उरलेला तिढा सोडवण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, भाजपचे संकटमोचक मानले जाणारे रवींद्र चव्हाण आणि निरंजन डावखरे उपस्थित होते. केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेतील जागावाटपाबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने आता नेत्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे प्रचंड दडपण आहे.
मुंबई महापालिकेत यावेळेस भाजप आणि शिंदे सेनेने 'मिशन महापौर' हाती घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईच्या या समीकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तूर्तास बाजूला ठेवण्यात आल्याचे समजते. सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 140 जागांवर, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 87 जागांवर लढण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही पक्ष सध्या सावध पावले टाकत असून, अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
मुंबईत जरी जागावाटपाचे गणित सुटल्याचे दिसत असले, तरी उपमुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मात्र भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. ठाण्यात भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी केली जात आहे, जी शिवसेनेला पचनी पडत नाहीये. ठाण्यातील भाजपचे स्थानिक नेते निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी आपली आक्रमक भूमिका प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे ठाण्यातील हा वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला असून, येत्या 24 तासांत त्यावर काय तोडगा निघतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुसरीकडे, पुण्यात मात्र महायुतीच्या जागावाटपाचा फटका अंतर्गत रोषाच्या रूपाने बाहेर येत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यात स्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यात शिवसेनेने 35 जागांची मागणी केली होती, मात्र भाजपने केवळ 15 जागाच देऊ केल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. "भाजपसमोर पक्ष कमी पडत आहे," असा गंभीर आरोप करत कार्यकर्त्यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. या अंतर्गत संघर्षामुळे पुण्यात युतीची ताकद विखुरली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुणे, मुंबई आणि ठाण्यातील या वेगवान राजकीय घडामोडींनी आगामी महापालिका निवडणुकांचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. युती आणि आघाडीच्या या खेळात काही ठिकाणी नेत्यांची मने जुळली आहेत, तर काही ठिकाणी चिन्हाच्या आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरून जुने मित्र दुरावले आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांनी घेतलेली सावध भूमिका आणि 'वेट अँड वॉच'चे धोरण यामुळे निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी अधिकच रंगतदार होणार आहे. या त्रिशंकू आणि चुरशीच्या लढतीत मतदार आता कोणाच्या पदरात यशाचे दान टाकतात आणि कोणत्या चिन्हाची जादू चालते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.