कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवत सत्तास्थापनेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तापरिवर्तन झाले असून, आता सर्वांच्या नजरा नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाकडे लागल्या आहेत. विजयाचा जल्लोष सुरू असतानाच राज्याच्या अनेक भागांतून हिंसक संघर्षाच्या बातम्याही समोर येत आहेत. विशेषतः भाजपचे दिग्गज नेते सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय आणि पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
अमित शाह यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक बैठक
बंगालमधील नवीन सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. आज (शुक्रवार, 8 मे 2026) कोलकाता येथे भाजप विधिमंडळ पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी भूषवणार आहेत. विजयानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच बंगाल दौरा असून, या दौऱ्यात ते राज्य भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी प्राथमिक चर्चा करतील. सायंकाळी चार वाजता नवनिर्वाचित आमदारांची औपचारिक बैठक होईल, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सुवेंदु अधिकारींचे नाव चर्चेत; नवीन चेहऱ्यांना संधी?
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांचे नाव सर्वात आघाडीवर मानले जात आहे. मात्र, भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पक्ष नेतृत्व यावेळी सरकार आणि संघटना यामध्ये वैचारिक बांधिलकी आणि संघटनात्मक अनुभवाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. संभाव्य मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांसोबतच अनेक नव्या आणि धक्कादायक चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये प्रशासकीय अनुभव असलेल्या माजी अधिकाऱ्यांपासून ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत अनेकांचा समावेश असू शकतो.
आरजी कर पीडितेच्या मातेसह 'हे' चेहरे मंत्रिमंडळात?
वृत्तानुसार, पहिल्यांदाच आमदार झालेल्या रत्ना देबनाथ यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. रत्ना देबनाथ या आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेच्या आई आहेत. त्यांच्यासोबतच भारत सेवाश्रम संघाचे माजी संत उत्पल महाराज, माजी आयपीएस अधिकारी राजेश कुमार आणि माजी एनएसजी कमांडो दिपांजन चक्रवर्ती यांची नावेही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. या चेहऱ्यांच्या माध्यमातून भाजप बंगालमध्ये एक सामाजिक आणि भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विधानसभा अध्यक्ष आणि महिला उपमुख्यमंत्रिपदाचे गणित
मंत्रिमंडळासोबतच विधानसभा अध्यक्षपदासाठीही चाचपणी सुरू झाली आहे. माणिकतला येथील आमदार तपस रॉय यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी एका महिला आमदाराला उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यातील समन्वय बैठकीत वैचारिक एकरूपतेवर भर देण्यात आला असून, संघ परिवाराशी जुन्या असलेल्या निष्ठावंतांना सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची चिन्हे आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.