Pune Election 2026: "आम्हाला हलक्यात घेऊ नका!" पुण्याच्या आखाड्यात चंद्रकांत पाटलांची अजित पवारांना इशारा

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर भाजपकडून थेट इशारे देण्यात आले असून, सत्तेत असूनही महायुतीतील तणाव उघड झाला आहे.
Pune Election 2026: "आम्हाला हलक्यात घेऊ नका!" पुण्याच्या आखाड्यात चंद्रकांत पाटलांची अजित पवारांना इशारा

पुणे: राज्यात सत्तेच्या सिंहासनावर एकत्र बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्तेसाठी दोन्ही पक्षांत जुंपली असून, आरोपांच्या फैरी आता थेट धमक्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. अजित पवारांनी भाजपच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी "आम्हाला हलक्यात घेऊ नका," असा सज्जड दम भरला आहे.

अजित पवारांनी भाजपवर केलेल्या 'भ्रष्टाचारी' टीकेमुळे भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "नगरपालिका निवडणुकीत अजित पवार म्हणायचे की तिजोरीची चावी त्यांच्याकडे आहे, तेव्हा मी म्हणालो होतो की तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. आता ते दमदाटीची भाषा करत आहेत. पण दादा, दमानं घ्या आणि आम्हाला हलक्यात घेऊ नका; विसरू नका की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचेच आहेत," अशा कडक शब्दांत पाटलांनी पवारांना इशारा दिला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट सामना रंगला आहे. अजित पवारांनी भाजपच्या कारभारावर 'राक्षसी भूक' आणि 'हप्तेखोरी' सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीतील हे दोन प्रमुख पक्ष आमनेसामने आल्याचे चित्र आहे. सत्तेत असूनही एकमेकांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा: BMC Election : रामदास कदमांचा घणाघात, अमित-आदित्य ठाकरेंचा पिल्लं म्हणून उल्लेख

केवळ चंद्रकांत पाटीलच नव्हे, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. "अजित पवारांना सोबत घेताना आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आधीच सावध केले होते," असे खळबळजनक विधान चव्हाणांनी केले. अजित पवारांची भाषा आणि आरोप पाहता, आता भाजपनेही बचावात्मक पवित्रा सोडून आक्रमक होण्याची तयारी दर्शवली आहे.

भाजपच्या 'राक्षसी भुके'वर टीका करणाऱ्या अजित पवारांना रवींद्र चव्हाणांनी थेट आरोप केला आहे. "आम्ही जर तुमची प्रकरणे बाहेर काढायला लागलो आणि आरोप सुरू केले, तर अजितदादांना मोठी अडचण होईल," असे चव्हाण म्हणाले. सत्तेत सोबत असूनही एकमेकांच्या उणिवा काढल्या जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेला हा कलगीतुरा केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहणार की त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदाचा दाखला देऊन भाजपने अजित पवारांना दिलेला इशारा हा 'मोठा भाऊ' कोण, हे दाखवण्याचाच प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी काळात पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: Ajit Pawar In Pune : 'पुण्यातील त्रिकुट कारभार बदलायला हवा'; विकासकामांवरून अजित पवार भडकले, ते त्रिकुट कोण?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version