वाहतूक प्रशासनाने अचानक बेस्टच्या एसी बस ४०० बस बंद केल्या आहेत. या बस मातेश्वरी कंपनीच्या आहेत. गेले अनेक महिने या बसला अचानक आग लागत आहे यामुळे या बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असून अचानकपणे ४०० बस बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ झाला आहे. तसेच उन्हामध्ये आता साध्या बसने प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईकरांसाठी बेस्ट बस सेवा ही लाईफलाईन समजली जाते. दररोज जवळपास ३० लाखांच्या आसपास प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. मात्र, मागील काही दिवसांत तीन बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली आहे. अंधेरीतील आगरकर चौकात ज्या बसला आग लागली ती बस मातेश्वरी या कंत्राटदाराची आहे. त्यामुळे आता, या कंत्राटदाराच्या ताफ्यातील बसेसची तपासणी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने या बसेसची तपासणी होणे आवश्यक असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. प्रवाशांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
एकाच वेळी एवढ्या प्रमाणावर बसेस धावणार नसल्याने बेस्ट बसच्या वेळापत्रकात बदल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. आधीच मुंबईत विविध कामांमुळे वाहतूक कोंडी असल्याने बस उशिराने धावतात. त्यातच आता, बसची संख्या कमी होणार असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.