Gautam Adani in Baramati: रोहित पवारांनी चालवली गाडी, अजित पवारांनी केलं स्वागत; देशातील पहिल्या एआय कॉलेजचं अदानी यांच्या हस्ते बारामतीमध्ये उद्घाटन

गौतम अदानी यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम केवळ शैक्षणिक न राहता संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
Gautam Adani in Baramati: रोहित पवारांनी चालवली गाडी, अजित पवारांनी केलं स्वागत; देशातील पहिल्या एआय कॉलेजचं अदानी यांच्या हस्ते बारामतीमध्ये उद्घाटन

बारामती: राजकारणाच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे, 'तुतारी' आणि 'घड्याळ' अशा दोन वेगवेगळ्या चिन्हांखाली राज्याचा रणसंग्राम गाजवणारे 'पवार' आज एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी एकत्र आले. निमित्त होते बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या अत्याधुनिक 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) महाविद्यालयाचे उद्घाटन. विशेष म्हणजे, ज्या उद्योगपती गौतम अदानींवरून राष्ट्रीय राजकारणात राहुल गांधी सतत टीकास्त्र सोडतात, त्याच अदानींच्या स्वागतासाठी बारामतीत संपूर्ण पवार कुटुंबीयांनी रेड कार्पेट अंथरल्याचे पाहायला मिळाले.

या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही काळापासून राजकीय संघर्षात विखुरलेले पवार कुटुंब आज एकाच चौकटीत दिसले. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार हे सर्वजण अदानींच्या स्वागतासाठी आणि कौतुकासाठी एकत्र होते. रोहित पवार यांनी स्वतः कार चालवत अदानींना केंद्रापर्यंत आणले, तर अजित पवारांनी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले. राजकारणात कितीही मतभेद असले, तरी बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण कुटुंब 'एक' असल्याचे चित्र या निमित्ताने संपूर्ण राज्याने पाहिले.

कार्यक्रमात बोलताना उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. "शरद पवार यांना सर्वच क्षेत्रांतील सखोल माहिती आहे. ते केवळ माझे मित्रच नाहीत, तर माझे आदरणीय मार्गदर्शक आणि आदर्श आहेत," अशा शब्दांत अदानींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अदानी समूहाने या एआय सेंटरच्या उभारणीसाठी भरीव मदत केली असून, यापूर्वीही अदानींनी बारामतीला भेट देऊन शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत पवारांशी सविस्तर चर्चा केली होती.

हेही वाचा: BMC Election 2026: ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीत धाकधूक; फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, काय होणार निर्णय?

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील तुफान संघर्षानंतर आता दोन्ही गट पुन्हा जवळ येण्याच्या हालचाली पडद्याआड सुरू असल्याची चिन्हे आहेत. अशा संवेदनशील काळात अदानींनी बारामतीचे अतिथ्य स्वीकारणे आणि पवारांनी दिलेला प्रतिसाद, हे केवळ शैक्षणिक उद्घाटन आहे की भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अदानी आणि पवार यांचे स्नेहसंबंध तसे जुनेच आहेत, मात्र राज्यातील बदलत्या राजकीय वळणावर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बारामतीतील या अत्याधुनिक महाविद्यालयास परवानगी मिळाल्यानंतर अदानींनी पुन्हा एकदा पवारांच्या 'होम ग्राऊंड'वर हजेरी लावून आपला ऋणानुबंध अधोरेखित केला आहे. या भेटीमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळणार की महाराष्ट्राच्या राजकारणात 'पवार-अदानी' फॅक्टर नवी समीकरणे जुळवणार, हे येणारा काळच ठरवेल.

या एआय सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान उपलब्ध होणार असून, बारामतीने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात देशात आघाडी घेतली आहे. शैक्षणिक प्रगतीचा हा टप्पा गाठतानाच पवार कुटुंबीयांच्या या 'कौटुंबिक आणि राजकीय' भेटीने सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा घडवून आणली आहे.

हेही वाचा: No Network No Vote : 'नेटवर्क नाही, मत नाही!', रत्नागिरी जिल्ह्यातील गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version