नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांना फसवून त्यांच्याशी असभ्य वर्तन केल्याच्या आरोपांमुळे खरात सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल असून त्यापैकी आठ गुन्हे महिलांशी संबंधित आहेत.
“चमत्कार नव्हे, हातचलाखी”
एसआयटी चौकशीत खरातने महत्त्वाची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. “मी कोणताही चमत्कार करत नव्हतो, हातचलाखी आणि युक्त्या वापरून महिलांना जाळ्यात ओढत होतो,” असे त्याने कबूल केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, “दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए,” असे वादग्रस्त विधानही त्याने चौकशीत केल्याची माहिती मिळत आहे.
राजकीय व सामाजिक फसवणूक
चौकशीतून असेही उघड झाले आहे की, अध्यात्माच्या आडून खरातने केवळ महिलांनाच नव्हे तर काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनाही त्याच्या प्रभावाखाली आणल्याची शक्यता तपासली जात आहे.
SIT ची चौकशी तीव्र
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून समितीचे नेतृत्व पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते करत आहेत. आज या संदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून त्यातून आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
मुलीचीही चौकशी
सूत्रांच्या माहितीनुसार, आज खरातची मुलगी तृप्ताबाला हिचीही एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. तपासात असे समोर आले आहे की, खरातने तिच्या नावावर कोट्यवधी रुपयांची जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या दिशेनेही तपास वाढवण्यात आला आहे. तसेच, लवकरच त्याच्या दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
प्रकरणाला गंभीर वळण
मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दररोज नवे खुलासे समोर येत असल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे.
एकूणच, अशोक खरात प्रकरण आता केवळ महिलांवरील अत्याचारांपुरते मर्यादित न राहता आर्थिक गैरव्यवहार आणि प्रभावाचा गैरवापर अशा विविध अंगांनी उलगडत असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.