नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात एकामागोमाग एक नवे खुलासे समोर येत आहेत. धर्माच्या नावाखाली कथित अघोरी कृत्ये आणि महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांनंतर पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात दोन महिला अधिकाऱ्यांचाही संबंध असल्याची चर्चा ताजी असतानाच आता आणखी एक नाव चर्चेत आले आहे. नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा अशोक खरातसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये खरात गोडसे यांचा हात पाहताना दिसत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय व्यक्ती अशोक खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांचाही हा फोटो व्हायरल झाल्याने तेही खरातच्या संपर्कात होते का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
गोडसे यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हेमंत गोडसे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “मी भविष्य पाहण्यासाठी गेलो नव्हतो. एका मित्राच्या कार्यालयात गेलो असताना अशोक खरात यांची भेट झाली. त्या वेळी त्यांनी स्वतःहून माझा हात पाहण्याची इच्छा व्यक्त केली.” गोडसे यांनी स्पष्ट केले की, “त्यामुळे माझा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.”
दरम्यान, अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी विविध राजकीय व्यक्तींची नावे चर्चेत येत आहेत. त्यामुळे या प्रकरणातून पुढे आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.