नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण राज्यात सध्या चांगलेच गाजत असून तपासादरम्यान एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. धर्माच्या नावाखाली कथित अघोरी कृत्ये आणि आर्थिक व्यवहारांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता हवाला रॅकेटचा धागा समोर आल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परदेशात पैसे पाठवण्यासाठी अशोक खरात हवाला रॅकेटचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारासाठी काही प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांची मदत मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत विविध कलमान्वये सुमारे 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परदेशात पैसे पाठवण्याचा तपास
तपास यंत्रणांकडून आता अशोक खरातने नेमके किती पैसे परदेशात पाठवले, त्या पैशांचा स्रोत काय होता आणि त्याने परदेशात कोणती मालमत्ता निर्माण केली आहे का, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणात काही प्रशासकीय सेवेत कार्यरत तसेच माजी अधिकारी आणि काही पदस्थ व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
मोठी नावे समोर येण्याची शक्यता
तपास पुढे जात असताना या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची आणि संबंधित व्यक्तींची भूमिका काय होती, त्यांनी खरातला कशी मदत केली, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात प्रशासन पुढे कोणती कारवाई करते आणि हवाला व्यवहारांबाबत नेमके कोणते पुरावे समोर येतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.