Amit Thackeray: ‘मराठी माणसाची प्रगती होऊ नये…’ अमित ठाकरेंचा मध्य रेल्वेवर हल्लाबोल; थेट पत्र लिहून मोठी मागणी

अमित ठाकरे यांनी मध्य रेल्वेवर मराठी भाषेच्या वापराबाबत टीका केली आहे.
Amit Thackeray: ‘मराठी माणसाची प्रगती होऊ नये…’ अमित ठाकरेंचा मध्य रेल्वेवर हल्लाबोल; थेट पत्र लिहून मोठी मागणी

Amit Thackeray: मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी मध्य रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका करत मराठी भाषेच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सांगितले की, 2008 साली राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी तरुणांना रेल्वे भरतीत प्राधान्य मिळावे आणि परीक्षा मराठीत घेण्यात याव्यात यासाठी मोठा संघर्ष करण्यात आला होता. त्यानंतर काही वर्षे रेल्वे भरतीच्या परीक्षा मराठीत घेतल्या गेल्या, मात्र आता पुन्हा मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमित ठाकरे यांनी प्रशासनाला सवाल करत विचारले की, मराठी माणसाच्या संयमाची सतत परीक्षा का घेतली जाते? रेल्वे भरती प्रक्रियेत मराठीचा समावेश न करणे हे स्थानिक युवकांवर अन्याय करणारे आहे, असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात होणाऱ्या भरती प्रक्रियेत स्थानिक भाषेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मनसेने मध्य रेल्वेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणीही पक्षाने लावून धरली आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे मुंबईतील कोकणवासीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. मनसेकडून असा इशाराही देण्यात आला आहे की, पुढील काही दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना रोखण्याचा इशारा देत पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमित ठाकरेंचं ट्विट (जसं आहे तसं): 

मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेतून मराठीला हद्दपार करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध! 

२००८ साली राज साहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी रेल्वे भरतीमध्ये मराठी भाषेचा आणि भूमिपुत्रांचा हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यानंतर २०१७, २०१९ आणि अगदी २०२३ पर्यंत या परीक्षा मराठीत होत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे?

मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने १६ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘GDCE 01/2026’ या अधिसूचनेत Computer Based Test (CBT) परीक्षेचे माध्यम केवळ ‘हिंदी आणि इंग्रजी’ ठेवले आहे. मराठी भाषेला या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक हद्दपार करण्याचा हा घाट घातला जात आहे.

रेल्वे प्रशासनाला आमचे काही थेट सवाल:
? ऑगस्ट २०२५ मध्ये रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत आश्वासन दिले होते की परीक्षा १५ प्रादेशिक भाषांत होतील. मग केंद्राचा हा आदेश स्थानिक अधिकारी कचऱ्याच्या टोपलीत टाकत आहेत का?
? विभागीय पदोन्नतीसाठी (Departmental Exam) मराठीची ‘एलर्जी’ का? मराठी माणसाची प्रगती होऊ नये, अशी नेमकी कोणाची इच्छा आहे?
? महाराष्ट्राच्या जमिनीवर नोकरी करायची आणि नोकरी देताना मात्र मराठीचा विचार करायचा नाही, ही कसली दडपशाही?

आमचा स्पष्ट इशारा आहे, 
त्वरीत या अधिसूचनेत बदल करून ‘मराठी’ भाषेचा सन्मानाने समावेश करा. अन्यथा, या अपमानाचा जाब विचारायला आणि मराठी कामगारांच्या हक्कासाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ मैदानात उतरेल.

लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही! ?

-अमित राज ठाकरे
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version