क्रुझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई एनसीबी विभागीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. याप्रकरणी त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. क्रांती रेडकर यांनी लिहिलेल्या पत्राला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही लढाई एनसीपी आणि एनसीबीमध्ये आहे,’ असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘क्रांती रेडकर मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. आज बाळासाहेब ठाकरे जरी नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तीच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे, शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथे कोणावरही अन्याय होणार नाही.’
‘क्रांती रेडकरवर कोणीही व्यक्तिगत टीका-टिपण्णी केली असे मला वाटत नाही. त्यामुळे एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा काय संबंध? महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी येऊन इथे आमच्या मराठी लोकांना त्रास देतात. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.