अकोल्यातून मोठी बातमी समोर येत आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या भोंदू चेतन महाराजावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात काल रात्री उशिरा महिला व बालकल्याण समितीकडून तक्रार दाखल झाली आहे. निंबा गावात अंधश्रद्धेचा अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला होता. गावातील चेतन महाराज मुळे या भोंदू बाबाने लहान मुलांवर उपचाराच्या नावाखाली अक्षरशः लहान मुलांना दाताने उचलले, अन गरागरा फिरवले होते. याचे व्हिडीओ प्रचंड वायरल झाले. उपचाराच्या नावाखाली अक्षरशः भोंदू चेतन बाबाचा लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरु होता. या निंबा गावात 4 महाराजांचे दरबार भरत असल्याची माहिती समोर येत आहे.
लहान मुलांना दाताने उचलणे, खिळ्यांच्या आसनावर बसणे यासोबतच अनेक अघोरी प्रकार हा भोंदू महाराज करतो. दरम्यान, या प्रकरणी अखेर कलम 125 भारतीय न्यायसंहीता, कलम 75 बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 (बालकांवरील क्रुरता) तसेच कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायदा 2013 (अंधश्रद्धा पसरविणे व अमानुष कृत्य) अशा कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.
कोण आहे चेतन महाराज मुळे?
चेतन सुनील मुळे असं या भोंदू महाराजाचे पुर्ण नाव आहे. चेतन मुळे गुलाल शेष बाबांच्या नावाने दरबार भरतो. दहावी नापास असलेल्या महाराजांचा गेल्या दहा वर्षांपासून दरबार भरतो. दरबारात लिंबू फेकणे, कोडं सोडवणे, अनेक व्याधी, रोग आणि कौटुंबिक समस्यांवर महाराजांचा उपचाराचा दावा करतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.