पुणे: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आजही शोकसागरात बुडालेला आहे. या घटनेला काही दिवस उलटले असले तरी, या अपघातामागचे नेमके कारण काय? हा अपघात होता की घातपात? या प्रश्नांनी राजकीय वातावरण तापलेले आहे. याच पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘या भीषण अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल लवकरच सरकारकडे येईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले असून, सध्या ‘एएआयबी’ (AAIB) आणि ‘डीजीसीए’ (DGCA) या दोन्ही यंत्रणांचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले.
ब्लॅक बॉक्समधून उलगडणार गूढ
मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, अपघातग्रस्त विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ यशस्वीरित्या ताब्यात घेण्यात आला आहे. हा ब्लॅक बॉक्स म्हणजे कोणत्याही विमान अपघाताच्या तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतो. यातील डेटा डाऊनलोड करण्याचे काम सुरू असून, त्यानंतर त्याचे तांत्रिक विश्लेषण केले जाईल. विमानाच्या शेवटच्या क्षणी नक्की काय तांत्रिक बिघाड झाला होता किंवा वैमानिकांशी काय संवाद झाला, याची सविस्तर माहिती यातून समोर येईल. ही माहिती संकलित केल्यानंतरच प्राथमिक अहवाल प्रकाशित केला जाणार आहे.
‘घातपाता’च्या शंका आणि राजकीय खडाजंगी
28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या या हृदयद्रावक अपघातानंतर राजकीय वर्तुळात संशयाचे धुमारे फुटले आहेत. काही नेत्यांनी हा नियोजित घातपात असावा, अशी शक्यता उघडपणे बोलून दाखवली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून कडक शब्दांत इशारा दिला आहे. “अजित पवारांच्या मृत्यूचे कोणीही राजकारण करू नका, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. दुसरीकडे, यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी, "अजितदादांच्या जाण्याने लोक आजही सुन्न आहेत, लोकांचा या घटनेवर विश्वासच बसत नाहीये, पण राजकारण नेमकं कोण करतंय?" असा प्रतिसवाल केला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
उपलब्ध माहितीनुसार, 28 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी अजित पवार यांचे विमान बारामती धावपट्टीच्या जवळ असताना कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि इतर दोन सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खराब हवामान (लो व्हिजिबिलिटी) हे प्राथमिक कारण सांगितले जात असले तरी, विमानाच्या सुरक्षिततेबाबत आणि शेवटच्या क्षणी बदललेल्या वैमानिकांबाबत आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तपासाची चक्रे गतिमान
सध्या या प्रकरणाचा तपास केंद्र आणि राज्य स्तरावर सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. केंद्रीय विमान अपघात तपास आयोग तांत्रिक बाजू तपासत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा असा अकाली अंत झाल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आणि हुरहूर आहे. आता सर्वांच्या नजरा ब्लॅक बॉक्सच्या अहवालाकडे लागल्या आहेत, ज्यातून सत्य बाहेर येण्याची अपेक्षा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.