महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अजित पवार विमान अपघात प्रकरणात आता नवं वळण समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं असून, अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मिटकरींच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अकोल्यात एका कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरी यांनी अपघाताच्या दिवशीचा घटनाक्रम उलगडत एक धक्कादायक माहिती समोर आणली. अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळण्याच्या क्षणी त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही माहिती ऐकून घटनास्थळी असलेले ग्रामस्थही स्तब्ध झाले होते, असे मिटकरी यांनी सांगितले.
मिटकरींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास ते स्वतः घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा स्थानिकांनी त्यांना विमान कोसळण्याआधी घडलेल्या काही असामान्य बाबी सांगितल्या. गावकऱ्यांनी त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच विमानाचा भीषण स्फोट झाल्याचेही त्यांनी नमूद केले. ही बाब समोर आल्यानंतर अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की यामागे काही वेगळं कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
अजित पवार यांच्या मृत्यूबाबत पहिल्यापासूनच संशय व्यक्त करणारे अमोल मिटकरी आता अधिक आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा अपघात नसून जर घातपात असेल, तर त्यामागील सत्य बाहेर येईपर्यंत आपला लढा सुरूच राहील. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही केली असून, केवळ प्राथमिक तपासावर समाधान मानता येणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
मिटकरींच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती नेमकी कोण होती? ती प्रवासी होती की कर्मचाऱ्यांपैकी कुणी? अपघातापूर्वी विमानात नेमकं काय घडलं होतं? हे सर्व प्रश्न आता तपास यंत्रणांसमोर उभे ठाकले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही नेत्यांनी मिटकरींच्या दाव्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे, तर काहींनी अशा वक्तव्यांमुळे अफवा पसरू शकतात, असा इशाराही दिला आहे. मात्र, अजित पवार यांच्या निधनाने आधीच शोकसागरात असलेल्या राज्यात या नव्या दाव्यांमुळे अस्वस्थता वाढली असून, सत्य काय आहे, हे लवकरात लवकर समोर यावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.