राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला होता. विमान अपघात प्रकरणातील अहवाल समोर आल्यानंतर आता सीआयडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. दरम्यान, पुणे सीआयडी कार्यालयात व्हीएसआर कंपनीचे मालक, अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने अपघाताच्या मुद्यावर शंका उपस्थित केल्या. त्यांनी मुंबई, दिल्ली येथे पत्रकार परिषदा घेऊन आपले मुद्दे मांडले. तसेच विमान कंपनीबाबत अनेक शंकादेखील उपस्थित केल्या. परिणामी, सीआयडीने व्हीएसआर व्हेंचर्स या विमान कंपनीची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात सीआयडीने कंपनीला एक सविस्तर प्रश्नावली पाठवली असून, संचालक रोहित सिंग यांनाही चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह आणि कंपनीचे कर्मचारी यांची सीआयडी कार्यालयात चौकशी सुरू आहे.
हेही वाचा : Rajya Sabha Elections: पार्थ पवार विधानभवनात दाखल; राज्यसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज
सीआयडीने 28 जानेवारी रोजी झालेल्या विमानाचा प्रवास आणि त्याच्या बुकींग प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमानाचे भाडे किती होते, बुकींग कोणी केले, विमानाची तांत्रिक स्थिती काय होती आणि कंपनीची इतर कायदेशीर कागदपत्रे योग्य होती का, या सर्व बाबींचा तपास आता सीआयडी करणार आहे. अजित पवारांच्या प्रवासासाठी संबंधित विमानाची निवड कोणी केली? त्या दिवशी विमानासाठी वैमानिकाची (Pilot) नियुक्ती कोणी आणि कोणत्या निकषावर केली? विमानाचे नियमित मेंटेनन्स झाले होते का? अशा विविध मुद्यांवरील प्रश्नावली सीआयडीने व्हीएसआर कंपनीला पाठवली आहे. विशेष म्हणजे, DGCA ने 24 फेब्रुवारी रोजी दिलेल्या अहवालात व्हीएसआर कंपनीच्या कामकाजातील गंभीर दोष समोर आणले होते. या अहवालाचा आधार घेत आता सीआयडीने तपास अधिक तीव्र केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.