AI in Government: मंत्रालयात दर गुरुवारी भरणार एआयचा वर्ग; डिजिटल प्रशासनासाठी महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

महाराष्ट्र सरकार, एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता, मंत्रालय, मंत्रालय एआय प्रशिक्षण, AI प्रशिक्षण, डिजिटल प्रशासन, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा
AI in Government: मंत्रालयात दर गुरुवारी भरणार एआयचा वर्ग; डिजिटल प्रशासनासाठी महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल

राज्य प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) वापराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता दर गुरुवारी एआय, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा आणि नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचे नियमित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे शासकीय कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्याबरोबरच नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सरकारने आखलेल्या या उपक्रमाअंतर्गत मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दैनंदिन प्रशासकीय कामकाजात कसा करता येईल, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यामध्ये एआयबरोबरच क्लाउड तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि डिजिटल प्रशासनाशी संबंधित विविध विषयांचा समावेश असेल.

या प्रशिक्षणामुळे मंत्रालयातील फायलींची प्रक्रिया अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. तसेच विविध शासन निर्णय (GR) शोधणे, त्यांचा संदर्भ घेणे, विधिमंडळातील प्रश्नांची उत्तरे तयार करणे आणि प्रशासकीय माहितीचे विश्लेषण करणे यांसारखी कामे अधिक कमी वेळेत आणि अचूकपणे करता येणार आहेत. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे करण्याचाही सरकारचा मानस आहे. विविध योजनांसाठी अर्ज भरताना नागरिकांना मार्गदर्शन करणे, आवश्यक माहितीच्या आधारे अर्ज आपोआप तयार करून देणे, तसेच ऑनलाइन सेवांमध्ये अधिक सुलभता आणण्यासाठी एआयचा वापर करण्यात येणार आहे.

राज्य सरकारचे उद्दिष्ट केवळ मंत्रालयातील कामकाज डिजिटल करणे नसून, संपूर्ण प्रशासनाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे हे आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेला गती मिळेल, कागदोपत्री कामकाज कमी होईल आणि नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने उपलब्ध होण्यास मदत होईल. दरम्यान, राज्य सरकारने सप्टेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात देशातील अग्रगण्य राज्यांपैकी एक बनवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यासोबतच शासकीय यंत्रणेमध्ये एआयचा प्रभावी वापर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version