राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.
नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना मंगळवारी 17 डिसेंबरला सदनिका घोटाळाप्रकरणात दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे या न्यायालयीन निर्णयानंतर राजकीय पातळीवरही मोठी हालचाल झाली असून कोकाटे यांच्याकडील सर्व खाती तात्काळ काढून घेण्यात आली आहेत. त्यांचा संपूर्ण कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत माणिकराव कोकाटे यांच्यासह शिवसेना एकनात शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. माणिकराव कोकाटेंनंतर आता मंत्री संजय शिरसाट यांच्या विकेटची वाट पाहत असल्याचं रोहित पवारांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा- Manikrao Kokate: कोकाटेंची राजकीय कोंडी वाढली! कोर्टाने केले अटक वॉरंट जारी
दरम्यान रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे…! वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे! असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाट यांच्याही विकेटची वाट पहात आहोत!”
मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे…!
वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’… — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.