कोल्हापूर, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : केंद्र सरकारने साखर विकास निधीतून देशातील साखर कारखान्यांना दिलेल्या अकरा हजार कोटीपेक्षा अधिक कर्जाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील जादा व्याजाचे आठशे कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा १७९ सहकारी कारखान्यांना फायदा होणार आहे. फायदा होणार असलेल्या कारखान्यांपैकी बहुसंख्य साखर कारखाने महाराष्ट्रातील आहेत.
केंद्र सरकार साखर विकास निधी अंतर्गत आधुनिकीकरण, उस विकास, इथेनॅाल प्रकल्प, विस्तारीकरण, नवीन साखर कारखाने उभारणी यासाठी दोन टक्के दराने कर्ज दिले जाते. केंद्राने ११ हजार ३३९ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. पण मागील चार वर्षात साखर उद्योग अडचणीत असल्याने हप्ते वसुलीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्राने कर्जाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्बांधणी केल्यामुळे आता सात वर्षात कर्ज फेडता येईल. यातील पहिली दोन वर्षे हप्ते न भरण्यास मुभा मिळणार आहे.
लाभार्थी साखर कारखाने- १७९
एकूण कर्जवितरण- ११३३९ कोटी रुपये
आतापर्यंतची वसुली- ८८५१ कोटी रुपये
थकबाकी- २४८८ कोटी रुपये
जादा व्याजाची रक्कम- ७९७ कोटी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.