देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या मागील काही महिन्यांत तब्बल 1,187 मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच मुंबईत दिवसाला सरासरी 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. यावेळी केवळ ऑक्टोबर महिन्यात अपहरणाचे 136 गुन्हे नोंद झाली असून जानेवारी ते ऑक्टोबर या काळात महिलांसंबंधित एकूण 5,886 गुन्हे नोंद झाले.
ज्यात 1,025 बलात्काराच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या बलात्कारांच्या प्रकरणांपैकी 526 गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. पोलिसांनी तातडीने दखल घेत 1,187 पैकी 1,118 गुन्ह्यांची उकल केली असून, समुपदेशनानंतर मुलींना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाते. ऑक्टोबरमध्ये याप्रकरणात मुलींच्या बेपत्ता संख्येने उच्चांक गाठला असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये अल्पवयीन मुलींना राजस्थान, गुजरातसारख्या ठिकाणी लग्नासाठी तस्करी करण्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच याप्रकरणावर आता राजकीयवर्तूळातून देखील प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.