श्रीनगर, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अनंतनाग बारामुल्ला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाम नबी आझाद यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. आझाद यांनी बुधवारी १७ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेतली. यामुळे अनंतनाग बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघासाठी अद्याप भाजपाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. योग्य वेळी उमेदवार जाहीर करू, आम्हाला घाई नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तर भाजपा पराभवाच्या भीतीपोटी उमेदवार जाहीर करणे टाळत आहे, असे वक्तव्य अनंतनाग बारामुल्ला लोकसभा मतदारसंघाचे नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले.
गुलाम नबी आझाद २००५ ते २००८ या काळात जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यांनी २६ ऑगस्ट २००८ रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला. यानंतर आझाद यांनी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीची स्थापना केली. याच पक्षाकडून ते आधी लोकसभेची निवडणूक लढणार होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.