मुंबई, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : वंचितने शिरुर लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली मंगलदास बांदल यांची उमेदवारी शनिवार ४ एप्रिल रोजी रद्द केल्याचे जाहीर केले. बारामतीमध्ये राशपच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याच्या वंचितच्या निर्णयाला बांदल यांनी विरोध केला. या विरोधामुळेच वंचितने बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातील नव्या उमेदवाराची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी अधिसूचना निघणार आहे. यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
आतापर्यंत जाहीर झालेले शिरुरमधील प्रमुख उमेदवार
शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप
मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.
बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला. मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.