बुलढाण्यात शिवसैनिक आमनेसामने

बुलढाण्यात शिवसैनिक आमनेसामने

बुलढाणा, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेना फुटल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होणार आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.. महायुतीचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना तगडी टक्कर देण्यासाठी महा विकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी कडून ओबीसी कार्ड खेळत वसंतराव मगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके हे देखील छातीला माती लावून मैदानात उतरलेत.. वरवर पंचरंगी वाटत असलेली ही लढत मुळात दुहेरीच असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून सुद्धा बुलढाणा जागेवर दावा करण्यात आला होता. मात्र, बंडखोरी केलेल्या खासदारांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करणारच यासाठी शड्डू शिउबाठा गटाने बुलढाणा लोकसभेवर दावा केला होता. अखेर जागावाटपामध्ये बुलढाणा मतदारसंघ शिउबाठा गटाच्या वाट्याला आला. यानंतर शिउबाठा गटाकडून संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांनाच संधी देत पुन्हा उमेदवारी दिली आहे.

बुलढाणामध्ये गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची मोठी ताकद राहिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1989 मध्ये मेहकरमध्ये घेतलेल्या सभेनंतर ते आतापर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1995 मध्ये युतीचे सरकार आले तेव्हा बुलढाणामधून विजय शिंदे आणि प्रताप जाधव हे आमदार झाले होते. यानंतर शिवसेनेची घौडदौड कायम आहे. लोकसभा मतदारसंघ वाट्याला आल्यानंतर आतापर्यंत बुळढाणा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, आता फुटलेल्या शिवसेनेत पहिल्यांदाच बुलढाणामधील शिवसैनिक कोणाला निवडून देणार याची सुद्धा उत्सुकता आहे. जे शिवसैनिक गेल्या तीन दशकांपासून आपलाच उमेदवार निवडून देण्यासाठी लढले, तेच आता आपल्यातील एका शिवसैनिकाला पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत जीवाचे रान करणार आहेत.

या जागेवरून महायुतीमध्ये सुद्धा नाराजीचा खेळ रंगला होता. शिसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तिसरा शिवसैनिक सुद्धा रिंगणात उतरणार की काय? अशी चिन्हे होती. मात्र, संजय गायकवाड यांची नाराजी दूर झाल्यानंतर प्रतापराव जाधव यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आजपर्यंत बुलढाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिक प्रतापराव जाधव यांच्या खासदारकीसाठी लढले आता तेच शिवसैनिक एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नरेंद्र खेडेकर बाजी मारणार की प्रतापराव जाधव आपला किल्ला कायम राखणार? याचे उत्तर आता चार जून रोजीच मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version