मुंबई, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिउबाठाच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अर्चना पाटील निवडणूक लढणार आहेत. अर्चना पाटील या भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह यांची पत्नी आहेत. राणा जगजितसिंह आणि ओमराजे निंबाळकर हे चुलत भाऊ आहेत. यामुळे धाराशिवमध्ये दीर विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गुरुवार ४ एप्रिल रोजी प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
कोण आहेत अर्चना पाटील ?
धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आहेत.
तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.
२०१२ समाजकार्यातून राजकारणात पदार्पण.
धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव जिल्हा परिषद गटातून विक्रमी मतांनी विजयी.
२०१७ धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटातून विजयी.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली.
अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.
कोण आहेत राणा जगजितसिंह ?
राष्ट्रवादी ते भाजपा असा राजकीय प्रवास
राणा जगजितसिंह २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपात.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.
याआधी २००४ ते २००८ आणि २००८ ते २०१४ दोन वेळा परिषदेचे सदस्य
पाटील – निंबाळकर वैर
पाटील आणि निंबाळकर घराणे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक.
राणा जगजितसिंह पाटील आणि ओम राजेनिंबाळकर हे चुलतबंधू.
राजकीय मतभेद झाले, पवन राजेनिंबाळकर कुटुंबापासून वेगळे झाले.
दिवंगत पवन राजेनिंबाळकर हे ओम राजेनिंबाळकर यांचे वडील
त्यांनी २००४ मध्ये वडिलांविरोधात निवडणूक लढवली होती.
त्यात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा विजय झाला होता.
३ जून २००६ रोजी पवन राजेनिंबाळकर यांची हत्या झाली.
त्यानंतर दोन्ही कुटंबीयांत वैर वाढले.
याप्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटलांवर गुन्हा दाखल, प्रकरण न्यायप्रविष्ट.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घराणी
राजे निंबाळकर आणि पाटील ही धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणातील दोन्ही महत्त्वाची घराणे आहेत. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा मंत्रीपद भूषवलं आहे, तर धाराशिव लोकसभेचा खासदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे, तर राणा जगजीत सिंह पाटील यांनी मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. त्याचबरोबर ते तुळजापूरचे भाजपाचे आमदार आहेत. तर ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे डीसीस बँकेचे संचालक होते तर ओमराजे निंबाळकर हे कळंब धाराशिवचे आमदार होते. ओमराजे निंबाळकर यांनी २०१९ ते २०२४ या कालावधीत खासदार म्हणून काम पाहिलेले आहे.
राजे निंबाळकर आणि पाटील घराण्यात आत्तापर्यंत एकमेकांविरुद्ध अनेक निवडणुका झाल्या कधी निंबाळकर घराण्याला जनतेने कौल दिला तर कधी पाटील घराण्याला जनतेचा कौल मिळाला परंतु सर्वाधिक काळ पाटील घराणं हे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणातील सत्ता केंद्र म्हणून राहिलं आहे पाटील घराण्याचं जिल्ह्याच्या राजकारणावर एक हाती वर्चस्व राहिले आहे.
धाराशिव लोकसभेची निवडणूक ही अतिशय अटीतटीची आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे कारण एकीकडे ओमराजे निंबाळकर हे जनतेमध्ये पोहोचलेले आहेत तर पाटील घराणं हे गेली अनेक वर्ष जिल्ह्याच्या राजकारणातलं प्रमुख घराणे आहेत. तळागाळापर्यंत शेवटच्या खेड्यापाड्यातल्या माणसापर्यंत पाटील घराणं पोहोचलेलं आहे. खरं तर ही निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी होणार हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच पाहायला मिळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.