रश्मी बर्वेंना दिलासा, पण…

रश्मी बर्वेंना दिलासा, पण…

नागपूर, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला. न्यायालयाने जिल्हा जात नोंदणी समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना लोकसभेची २०२४ ची निवडणूक लढवता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.

याआधी जिल्हा जात नोंदणी समितीकडे तक्रार आली होती. समितीने चौकशी केली आणि तथ्य आढळल्यामुळे जात प्रमाणपत्र रद्द केले. या निर्णयामुळे रामटेक या राखीव मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी केलेला रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला होता. या निर्णयाला रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

रामटेक लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांच्याऐवजी त्यांचे पती श्याम बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता रामटेक लोकसभा मतदारसंघात राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं अशी लढत होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version