परभणी, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर परभणीतून लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या महादेव जानकर यांनी सोमवार १ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर परभणीत जानकरांच्या प्रचारासाठी महायुतीने सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे उपस्थित होते.
जानकर सामान्य माणूस आहे. मंत्री असतानाही ते अतिशय साधेपणाने राहिले आणि मंत्रीपद सोडल्यानंतरही साधेपणानेच वावरत आहेत. त्यांनी कधीही पदाचा स्वार्थ साधण्यासाठी वापर केला नाही. कायम जनहिताचा विचार करणे, जनहिताची कामं करणे याला जानकरांनी प्राधान्य दिले. अहोरात्र जनतेच्या भल्यासाठी काम करत राहणे हे जानकरांचे वैशिष्ट्य आहे. हा माणूस जिंकून आला तर परभणीचा विकास करेल, अशी ग्वाही देत महायुतीच्यावतीने फडणवीस यांनी जानकरांना मत देण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी जानकरांना मत देण्याचे आवाहन परभणीच्या जनतेला केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.